सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीत आग | पुढारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीत आग

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुख्य इमारतीच्या छतावर देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असताना डांबरी शीटला आग लागली. इमारतीच्या छतावर वारा वेगाने वाहत असल्याने आग जास्त भडकली. या वेळी विद्यापीठाच्या सुरक्षारक्षकांनी आग्निशामक यंत्राच्या माध्यमाने आग आटोक्यात आणली, तसेच दक्षता म्हणून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही मिनिटांतच आगीवर नियंत्रण मिळवले.

विद्यापीठाच्या आवारात मध्यभागी मुख्य इमारत आहे. शनिवारी (दि.29) सायंकाळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या छतावर देखभाल-दुरुस्तीचे काम सुरू असताना आग लागली. या वेळी अग्निशमन दलाची मदत पोहोचण्यापूर्वी विद्यापीठातील सुरक्षारक्षकांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर काही वेळांत अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करून काही मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले. औंध अग्निशमन केंद्र अधिकारी कमलेश सनगाळे, ड्रायव्हर अनिल निकाळजे, स्वप्नील वाघमारे, ओंकार कांबळे आदींनी बचावकार्य करीत आग आटोक्यात आणली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

 

Back to top button