वडगाव परिसरातील दोन इमारती जमीनदोस्त; महापालिका प्रशासनाची कारवाई | पुढारी

वडगाव परिसरातील दोन इमारती जमीनदोस्त; महापालिका प्रशासनाची कारवाई

धायरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : सिंहगड रोड परिसरातील वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजजवळ अनधिकृत बांधकाम केलेल्या दोन इमारतींवर नुकतीच कारवाई करण्यात आली. यात पाच मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. महापालिका बांधकाम विभाग झोन क्रमांक 2 च्या वतीने ही कारवाई करण्यात आली.

इमारतींच्या मालकांना महापालिकेच्या वतीने नोटीस बजाविण्यात आली होती. कारवाईस नागरिकांनी विरोध केला. परंतु, तो न जुमानता अधिकार्‍यांनी तणावग्रस्त परिस्थितीत कारवाई सुरू केली. या वेळी अधिकारी व नागरिकांत बाचाबाची झाली. दरम्यान, अधिकार्‍यांनी काही वेळ कारवाई थांबवून स्थानिक पोलिसांची मदत मागविली. सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दीपक कादबाने यांनी कर्मचार्‍यांच्या मदतीने जमावास पांगवून तणावग्रस्त परिस्थिती आटोक्यात आणली. त्यानंतर कडक पोलिस बंदोबस्तात कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली.

दोन हजार चौरस मीटर क्षेत्रावरील बांधकामांवर ही कारवाई करण्यात आली. बांधकाम अधीक्षक युवराज देशमुख यांच्या नियंत्रणाखाली कार्यकारी अभियंता हेमंत मोरे, उपअभियंता विजय कुमावत, प्रवीण भावसार, कनिष्ठ अभियंता उदय पाटील, महेश झोमन, हेमंत कोळेकर, रितेश शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जॉकटर, एक जेसीबी, गॅसकटर आणि 20 कर्मचार्‍यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली.

Back to top button