सद्गुरू शंकर महाराजांवरील टपाल पाकिटाचे अनावरण | पुढारी

सद्गुरू शंकर महाराजांवरील टपाल पाकिटाचे अनावरण

पुणे/धनकवडी; पुढारी वृत्तसेवा : सद्गुरू शंकर महाराज यांच्या समाधी सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या टपाल विभागाकडून शंकर महाराज यांचे प्रकाशचित्र असलंल्या टपाल पाकिटाचे खासदार व सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते प्रकाशित झाले. टपाल विभागाच्या पुणे विभागाचे जनरल पोस्ट मास्टर आर. के. जायभाय आणि रिपन ड्यूलेट यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. पाकिटावर सद्गुरू शंकर महाराज यांची सुरेख प्रतिमा आणि त्याभोवती त्यांच्याशी संबंधित त्रिशूळ, शंख, कमळ, बेलपत्र, कमंडलू, जपमाळ, गदा आणि चक्र या चिन्हांसह वटवृक्षाचे चित्र छापले आहे.

शिवाय आजच्या या विशेष दिवशी कॅन्सलेशन क्याचेट स्टॅम्पदेखील प्रकाशित झाले. त्यावर सद्गुरू शंकर महाराज यांचे कृष्णधवल चित्र, शिवलिंग, बेलपत्र, त्रिशूळ-डमरू आणि भगवा ध्वज यांची चित्रेदेखील प्रकाशित करण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे सद्गुरू शंकर महाराज यांच्या समाधीची तिथी आणि तारीख या निमित्ताने शासकीय दस्तऐवजात पहिल्यांदाच अधिकृतपणे अधोरेखित झाली.

दरम्यान, मठात महाराजांच्या जीवनावरील माहितीपत्रकाचे प्रकाशन पाटील यांनी केले. या पत्रकाचे संकलन आणि संकल्पना ट्रस्टच्या विश्वस्तांची आणि डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. माजी आमदार उल्हास पवार,आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सुनील कांबळे सहभागी झाले. समाधी ट्रस्टचे विश्वस्त सुरेंद्र वाईकर, सतीश कोकाटे, पिंपरी येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती आणि ट्रस्टचे विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, राजा सूर्यवंशी, डॉ. मिहीर कुलकर्णी, नीलेश मालपाणी, प्रताप भोसले यांनीही सहभाग घेतला.

Back to top button