पुणे : भारत गौरव रेल्वेचे मोठ्या दिमाखात उदघाटन | पुढारी

पुणे : भारत गौरव रेल्वेचे मोठ्या दिमाखात उदघाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारत सरकारची संकल्पना असलेल्या भारतगौरव रेल्वे गाडीचे शुक्रवारी सकाळी मोठ्या दिमाखात उदघाटन झाले. यावेळी पुणे रेल्वे स्थानक आणि भारत गौरव गाडीला फुग्यांनी आणि झेंडूच्या फुलांनी सजविण्यात आले होते. केंद्र शासनाच्या ‘देखो अपना देश’ या संकल्पनेनुसार सुरू करण्यात आलेल्या भारत गौरव यात्रेची पुण्यातील पहिली गाडी शुक्रवारी पुणे रेल्वे स्थानकावरून 10 च्या सुमारास सुटली. या गाडीला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ऑनलाईन उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखविला.

ही गाडी ‘पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा’ या नावाने धावणार असून, येत्या 11 तारखेला पुण्यातून आणखी एक गाडी धावणार आहे. कार्यक्रमावेळी आमदार सुनील कांबळे, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक नरेश लालवणी, विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, आयआरसीटीसीच्या व्यवस्थापकीय संचालक रजनी हसिजा व अन्य उपस्थित होते.

पुरी-गंगासागर दिव्य काशी यात्रा भारत गौरव ट्रेन 9 रात्री /10 दिवसांचा प्रवास असणार आहे. यामध्ये पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. जंगन्नाथ पुरी मंदिर, कोणार्क मंदिर, पुरी येथील लिंगराज मंदिर, कोलकाता येथील काली बारी आणि गंगा सागर, विष्णू पद मंदिर तसेच गया येथील बोधगया, काशी विश्वनाथ मंदिर आणि वाराणसी येथील गंगा घाट आणि प्रयागराज येथील त्रिवेणी संगम ही ठिकाणे पहाता येणार आहे.

Back to top button