पळसदेव : उष्माघातामुळे उजनीतील पक्षीसंख्येत घट; उन्हाच्या झळा पशु-पक्षांच्या जीवावर, अनेक पक्ष्यांचा मृत्यू | पुढारी

पळसदेव : उष्माघातामुळे उजनीतील पक्षीसंख्येत घट; उन्हाच्या झळा पशु-पक्षांच्या जीवावर, अनेक पक्ष्यांचा मृत्यू

पळसदेव(पुणे); पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड प्रमाणात वाढत चालली आहे. यामुळे वातावरणातील उष्णतेचा पारा 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचला आहे. उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे उजनीसह इतर छोटे-मोठे नदी, नाले, तलाव यांतील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे. यामुळे पाण्याचे बहुतांश स्त्रोत कोरडेठाक पडले आहेत, तर काही पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पशू, पक्षी, जनावरे पाण्यासाठी वणवण भटकंती करीत असून, अनेक पक्षी उष्माघाताने मृत्यू पावल्याचे दिसत आहे.

सध्या राज्यातील उष्णतेचा पारा कमालीचा वाढला असून, वाढत्या उष्णतेमुळे बहुतांश पाणवठे कोरडे पडले आहेत. यामुळे बहुतांश पशू-पक्ष्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मात्र दूषित पाणी आणि उष्माघाताचा परिणाम पशू-पक्ष्यांवरदेखील होत असून, अनेकांचे यातून जीव गेल्याचेही समोर आले आहे.

एरवी हजारोच्या संख्येने उजनी जलाशयावर दिसणारे पाणकोंबडी, बदक, पांढरे कावळे यासारख्या पक्ष्यांची संख्याही वाढत्या उष्णतेमुळे अचानकपणे कमी झाली आहे. धरणातील पाणी कमी होत असल्याने दलदलीच्या जागा तसेच सखल भागातील भूभाग रिकामा झाल्याने पशू-पक्ष्यांना मुबलक प्रमाणात कीटक, पानवनस्पती व मासे उपलब्ध होत असतानाही पक्ष्यांची संख्या मात्र मोठ्या प्रमाणावर रोडावली आहे.

नागरिकांनी पशू-पक्ष्यांची जबाबदारी घ्यावी

सध्या पाण्याचा जपून वापर करणे गरजेचे आहे. पाळीव व इतर पशू-पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज आहे. झाडे, इमारती, कॉलनी, गच्ची तसेच मोकळ्या जागी पक्ष्यांसाठी पाणी तसेच धान्य ठेवावे. त्यामुळे पशूपक्ष्यांसाठी उन्हाळा सुसह्य होईल. घराशेजारी पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटी तयार करावीत म्हणजे ऐन उन्हाळ्यात प्राण्यांचा जीव वाचवण्यास मदत होईल.

जागतिक तापमानात वाढ होत असून, नैसर्गिक वातावरणात बदल झाल्याने व प्रखर उन्हामुळे पक्षी त्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून चढ-उतार होत असलेल्या तापमानामुळे काही पक्षी मृत पावत आहेत, असा अंदाज आहे. वातावरणातील अस्थिरतेमुळे काही स्थलांतरित पक्षी विशेष करून अनेक बदकांच्या प्रजाती आपल्या मूळस्थानाकडे निघून गेले आहेत.

                            – डॉ. अरविंद कुंभार, ज्येष्ठ पक्षी व पर्यावरण अभ्यासक

Back to top button