पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना पुन्हा गुंडाळणार? | पुढारी

पिंपरी : ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ योजना पुन्हा गुंडाळणार?

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेने गुंडाळलेली पे अ‍ॅण्ड पार्क योजना सुरू केलेली आहे. चार ठिकाणी सुरू केलेले या योजनेला अल्प प्रतिसाद मिळत असून, 25 दिवसांत केवळ 32 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे ही योजना पुन्हा बंद करण्याची नामुष्की पालिकेवर ओढविणार असे दिसत आहे.

कोठेही वाहने लावणार्‍यांवर वाहतूक पोलिस कारवाई करीत नसल्याने तसेच, वाहनचालक शुल्क भरण्यास प्रतिसाद देत नसल्याने ठेकेदारांनी पे अ‍ॅण्ड पार्क योजना बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली होती. मात्र, आयुक्तांनी ही योजना अधिक सक्षम करून राबविण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार, ठेकेदार निर्मला ऑटो केअरने मोबाईल अ‍ॅप विकसित केले. त्यावर क्यूआर कोड असून, त्या माध्यमातून वाहन पार्क केल्यानंतर शुल्क भरता येणार आहे.

पालिका प्रशाससाने नव्या दमाने 1 एप्रिलपासून शहरातील चिंचवड येथील एम्पायर इस्टेट व चापेकर चौक, पिंपळे सौदागर येथील शिवार चौक आणि कासारवाडीतील नाशिक फाटा येथे पे अ‍ॅण्ड पार्क सुरू केले. मात्र, वाहनचालकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. अनेक वाहनचालक शुल्क देत नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे नव्याने सुरू केलेली ही योजना पुन्हा गंटागळ्या खात सुरू आहे. ही योजना किती दिवस तग धरते हे पाहावे लागणार आहे.

स्मार्ट सिटीचे अ‍ॅप हवेत
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीकडून संपूर्ण शहरातील वाहतूक सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तसेच, पार्किंग व्यवस्थेसाठी ‘स्मार्ट ट्रॉफीक’ नावाने मोबाईल अ‍ॅप विकसित केले जाणार होते. मात्र, ते अ‍ॅप अद्याप हवेतच आहे. त्यामुळे पालिकेच्या वाहतूक नियोजन विभागाने ठेकेदारामार्फत स्वतंत्र अ‍ॅप विकसित करून ते कार्यान्वितही केले आहे, असे कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड यांनी सांगितले. या प्रकारामुळे स्मार्ट सिटी कंपनीने दिलेले आश्वासने एक एक करीत फोल ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Back to top button