जेजुरीतील ऐतिहासिक चिंचेच्या बागेत घाणीचे साम्राज्य | पुढारी

जेजुरीतील ऐतिहासिक चिंचेच्या बागेत घाणीचे साम्राज्य

जेजुरी : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडेरायाच्या जेजुरी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ऐतिहासिक चिंचेच्या बागेत व होळकर तलावात प्रचंड घाण झाली आहे. दारूच्या -पाण्याच्या बाटल्या, थर्माकोलच्या पत्रावळ्या, शिल्लक राहिलेले खरकटे अन्न लगतच्या होळकर तलावात विसर्जित केल्यामुळे तलावातील पाणी दूषित झाले आहे. या ठिकाणीच येणार्‍या भाविकांनी स्नान व नैसर्गिक विधी केल्यामुळे तलावाभोवती नाक मुठीत धरून वावरावे लागत आहे. येथील स्वच्छतेच्या बाबतीत जबाबदारी कुणाची, चिंचेच्या बागेत कुलधर्म, कुलाचार धार्मिक विधी व जेवणावळी करणार्‍या भाविकांकडून कर वसूल करणार्‍या ठेकेदारांची? की भाविकांच्या वाहनांकडून प्रवेश कर वसूल करणार्‍या नगरपालिकेची? असा सवाल भाविक विचारत आहेत.

चिंचेच्या बागेतील अस्वच्छतेमुळे येणार्‍या भाविकांना असुविधेचा सामना करावा लागत आहे. खंडेरायाच्या देवदर्शनासाठी भाविक-भक्तांना कुलधर्म, कुलाचार करता यावा या हेतूने 250 वर्षांपूर्वी पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांनी ऐतिहासिक चिंचेच्या बागेची निर्मिती केली होती. भाविक-भक्त व शहरवासीयांसाठी लगतच 17 एकर जागेत विस्तीर्ण तलावाची निर्मिती केली. दरवर्षी मार्च ते जून हा लग्नसराईचा काळ व खंडेरायाचा जत्रा -यात्रा उत्सवांचा हंगाम असल्याने राज्यातून येणार्‍या भाविकांची संख्या लक्षणीय असते. पूर्वीच्या काळापासून चिंचेच्या बागेत भाविक-भक्त निवास करून जागरण गोंधळ, धार्मिक विधी व जेवणावळींचा कार्यक्रम करतात.

पूर्वीच्या काळी येथे भाविकांकडून कोणताही कर आकारला जात नव्हता. मात्र, 1998 साली महाराजा होळकर इंदौर संस्थानकडून चिंचेच्या बागेची मालकी आचार्य अत्रे प्रतिष्ठानकडे आली. कालौघात भविकांकडूनही या कुलधर्म, कुलाचार, धार्मिक विधींमध्ये कमालीचा बदल झाला. पुरणपोळीबरोबरच मांसाहारी जेवणावळी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होतात. जेजुरीच्या खंडेरायाचे देवदर्शन -कुलधर्म, कुलाचार,धार्मिक विधी आता फारच खर्चीक झाला आहे. भाविकांच्या वाहनाने जेजुरीत प्रवेश केला की नगरपालिकेचा वाहन प्रवेश कर भरावा लागतो. पुन्हा खासगी वाहनतळाचा आश्रय घेऊन तेथे वेगळी आकारणी होते. चिंचेच्या बागेत प्रवेश केला तर तेथे पावती वेगळीच फाडावी लागते. पुन्हा पाण्याचे जार विकत घ्यावे लागतात. प्रत्येक ठिकाणी भाविकांना पैसे मोजावे लागताते. मात्र, तशा सुविधा देण्यात व्यवस्थापन असमर्थ ठरत आहे.

चिंचेची बाग नगरपालिका किंवा देवसंस्थानकडे असावी
ऐतिहासिक चिंचेच्या बागेचे व्यवस्थापन नगरपालिका प्रशासन किंवा मार्तंड देवसंस्थानकडे असावे तरच भाविकांना येथे सुविधा उपलब्ध होऊ शकतील आणि होळकर तलावाची व परिसराची स्वच्छता राहील. मागील काळात देवसंस्थानच्या वतीने मुदत कराराच्या भाडेतत्त्वावर चिंचेच्या बागेची मागणी संबंधित संस्थेला केली होती. परंतु, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुरातत्त्व विभागाकडून ऐतिहासिक होळकर तलावाचे जतन, संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक विलास वहाणे व त्यांच्या सहकारी अधिकार्‍यांनी पाहणी करून 6 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. मात्र, विकासकामे केल्यानंतर स्वच्छता व व्यवस्थापन करण्याची जबाबदारी कुणाची,असाही प्रश्न पुरातत्त्व विभागाकडून उपस्थित होत आहे.

Back to top button