पिंपरी : उन्हाचा चटका वाढल्याने उष्माघाताचा धोका | पुढारी

पिंपरी : उन्हाचा चटका वाढल्याने उष्माघाताचा धोका

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सध्या उन्हाचा चटका वाढला आहे. पुढील दोन दिवसांमध्ये तापमानात एक ते दोन अंशाने वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे. राज्यभरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोकाही वाढला आहे. त्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नागरिकांना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये या आजारावर औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मार्च ते जून या कालावधीत दरवर्षी राज्यात उष्णतेमुळे विविध प्रकारचे आजार आढळून येतात. सद्यःस्थितीत राज्यभरात उष्णतेचे प्रमाण वाढलेले आहे. शहरामध्ये शनिवारी चिंचवड येथे 35.7 अंश सेल्सियस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

काय काळजी घ्याल?
पुरेसे पाणी प्या. ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
थेट येणारा सूर्यप्रकाश व उन्हापासून स्वतःचे संरक्षण करावे.
दुपारी 12 ते 4 या वेळात घराबाहेर पडणे टाळावे.
मुलांनी उन्हात खेळू नये.
लहान मुलांना आत ठेवून गाडी बंद करू नये.
उन्हात शारीरिक कष्टाची कामे करू नये.
दुपारी 2 ते 4 या वेळेत स्वयंपाक करू नये.
चप्पल न घालता/अनवाणी उन्हात चालू नये.
मद्य, चहा, कॉफी, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे.

उष्णतेच्या लाटेसंदर्भातील आजाराची लक्षणे

चक्कर येऊन पडणे
फेफरे येणे/झटके येणे
झोपेतून उठण्यास त्रास होणे/ उठता न येणे
गोंधळल्यासारखे बोलणे/वागणे
श्वासाची व हृदयाच्या ठोक्याची गती वाढणे
शरीराचे तापमान 105 फेरॅनाईट (40.5 सेल्सियस) पेक्षा अधिक होणे
स्नायूंमध्ये पेटके येणे, चिडचिड होणे, डोकेदुखी.
अशक्तपणा येणे, मळमळ व उलटी होणे, अधिक घाम येणे.

काय प्रथमोपचार कराल ?
उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास लगेचच नजीकच्या महापालिका दवाखाना किंवा रुग्णालयात उपचार घ्यावे. मात्र, व्यक्तीस रुग्णालयात त्वरित घेऊन जाणे शक्य नसल्यास खालील प्रथमोपचार करावेत.
पायाखाली उशी किंवा तत्सम काही ठेऊन आडवे पडायला सांगावे.
त्रास झालेल्या व्यक्तीला लगेच घरात/सावलीत आणावे.
व्यक्ती जागी असल्यास वारंवार थंड पाण्याचे घोट पाजावेत.
हवा येण्यासाठी पंख्याचा वापर करावा.
नळाच्या पाण्याच्या सुती कपड्याच्या पट्ट्या शरीरावर ठेवाव्यात.
उलटी होत असल्यास त्यांना एका कुशीवर वळवावे. जेणेकरून व्यक्ती गुदमरून जाणार नाही.
व्यक्ती बेशुद्ध असल्यास त्यांना खायला/प्यायला काहीही देण्याचा प्रयत्न करू नये.

राज्यभरात सध्या उष्णतेचे प्रमाण वाढले आहे. या पार्श्वभूमीवर, शहरातील नागरिकांना उष्माघाताचा त्रास उद्भवल्यास त्यांनी नजीकच्या महापलिका दवाखाना किंवा रुग्णालयात उपचार घ्यावे. महापालिकेची सर्व रुग्णालये व दवाखान्यांमध्ये या आजारावर औषधोपचार उपलब्ध करून देण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःची व इतरांची काळजी घ्यावी.

             – डॉ. लक्ष्मण गोफणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका.

Back to top button