बीटकॉईनमधील गुंतवणुकीच्या आमिषाने 23 लाखांचा गंडा | पुढारी

बीटकॉईनमधील गुंतवणुकीच्या आमिषाने 23 लाखांचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : बीटकॉईन या आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने एका व्यावसायिकाला सायबर चोरट्यांनी तब्बल 23 लाख 24 हजार रुपयांचा आर्थिक गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी, खराडी येथील 45 वर्षीय व्यावसायिकाने चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाईलधारक व बँकधारक व्यक्तींच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी व्यावसायिकाच्या मोबाईल क्रमांकावर सायबर चोरट्यांनी संदेश पाठविला होता. आभासी चलनात (बीटकॉईन) गुंतवणूक केल्यास मोठा नफा होईल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. सायबर चोरट्यांनी दाखविलेल्या आमिषाला व्यावसायिक बळी पडला. त्यानंतर व्यावसायिकाने वेळोवेळी ऑनलाईन पद्धतीने चोरट्यांनी दिलेल्या बँक खात्यात 23 लाख 24 हजार रुपये जमा केले. गुंतवणूक केल्यानंतर व्यावसायिकाला परतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिस उपनिरीक्षक रामेश्वर रेवले तपास करत आहेत.

Back to top button