सांडपाणी, जलपर्णीमुळे भीमेची झालीय गटारगंगा | पुढारी

सांडपाणी, जलपर्णीमुळे भीमेची झालीय गटारगंगा

राजेंद्र खोमणे : 

नानगाव : दौंड तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्राची वेगवेगळ्या माध्यमांतून सोडलेल्या सांडपाण्यामुळे तसेच दरवर्षी येणार्‍या जलपर्णीमुळे गटारगंगा झाली आहे. यामुळे नदीकाठच्या गावांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या जलपर्णीमुळे मासेमारी व्यवसाय देखील संकटात सापडला आहे. पूर्वी याच भीमा नदीचे पाणी नदीकाठच्या गावातील नागरिक पिण्यासाठी वापरत होते. काचेसारखे चकचकीत पाणी नळ पाणीपुरवठ्याच्या माध्यमातून गावातील नागरिकांना उपलब्ध होत होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून औद्योगिकीकरण वाढल्याने कंपनी, कारखाने तसेच छोट्या-मोठ्या गावांतील खराब पाणी नदीपात्रात सोडण्यात येऊ लागले, तेव्हापासून नदीचे पाणी अशुद्ध व खराब झाले आहे.

कंपनी, कारखाने व गावातील खराब पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे सर्वप्रथम हे पाणी पिण्यायोग्य राहिले नाही, तर काचेसारखे शुध्द असणार्‍या पाण्याला काळा रंग येऊ लागला. यातच पाण्याला दुर्गंधी देखील येऊ लागली. पाण्याची वाढती दुर्गंधी बघता नागरिक तर सोडा, जनावरे देखील पाण्याला तोंड लावत नाहीत.

नदीत सोडलेले सांडपाणी व वाढलेली जलपर्णी, यामुळे नदीपात्रातील जलचर व मासे मृत्युमुखी पडतात. त्यामुळे सांडपाणी, जलपर्णी व मृत पावलेले मासे, याची मोठी दुर्गंधी निर्माण होते. ही दुर्गंधी नदीकाठच्या गावांची डोकेदुखी ठरत असते. नदीपात्रातील जलपर्णीमुळे डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत जाऊन पुढे गावागावांत डासांचा मोठा प्रादुर्भाव होऊन डासांमुळे आजारी पडणार्‍या नागरिकांची संख्या वाढत गेल्याने आरोग्याचा प्रश्न नेहमीच ऐरणीवर येतो.

मासेमारी व्यवसाय संकटात
नदीपात्रात सोडलेले सांडपाणी आणि त्यातच जलपर्णीचा वाढता विळखा म्हणजेच ’दुष्काळात तेरावा महिना’ असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. वाढत्या जलपर्णीमुळे सुरुवातीला नदीकाठच्या गावांतील मासेमारी करणार्‍या कुटुंबांवर आर्थिक संकट कोसळले. जलपर्णीमुळे नदीपात्रात जाऊन मासेमारी करणे अवघड झाले आहे. अशा कुटुंबांचा तीन ते चार महिन्यांचा कालखंड अडचणीचा ठरत असून, त्यांची आर्थिक घडी विस्कळीत होत असते.

कायमचा तोडगा निघावा
जलपर्णीमुळे पाण्याला दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सतावत असतो. दुसरीकडे, मासेमारी व्यवसाय संकटात येत असतो. त्यामुळे या प्रश्नावर कायमचा तोडगा निघावा, अशी मागणी पुढे येत आहे.

Back to top button