पुणे : भिगवण येथील जिल्हा बँकेच्या कामावर हातोडा | पुढारी

पुणे : भिगवण येथील जिल्हा बँकेच्या कामावर हातोडा

भिगवण : पुढारी वृत्तसेवा :  कोट्यवधी रुपये खर्चून चार वर्षे आधीच रडतरखडत व रेंगाळत काम चाललेल्या जिल्हा बँकेच्या भिगवण शाखेची नवी इमारत पूर्णत्वास आली आहे. असे असतानाच बांधकाम झालेल्या अंतर व बाह्यबाजूच्या कामावर हातोडा मारून तोडफोड सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे इमारतीला ठिगळच ठिगळ दिसू लागल्याने इमारतीचा प्लॅन फसला आहे का? असा प्रश्न आहे.
जिल्हा बँकेच्या भिगवण शाखेचे काम अतिशय निकृष्ट, दर्जाहीन सुरू असल्याने याची पाहणी खुद्द अजित पवार यांनी करावी, असे सविस्तर वृत्त दै. ‘पुढारी’ने 27 मे 2022 रोजी प्रसिद्ध केले होते. त्यानंतर वेळोवेळी बँकेचे अधिकारी आले आणि ठेकेदाराच्या कानात काहीतरी सांगून गेले.

आता मात्र इमारतीचे बांधकाम झाले असले, तरी फरशी, प्लम्बिंग, लाईट फिटिंग, फर्निचर अशी बरीच कामे बाकी आहेत. परंतु जे बांधकाम झाले आहे, त्यातील खालील तळमजल्यातील स्टील व सिमेंट वापरून उभा केलेल्या भिंती, टेरेसवरील स्लॅबचा मोठा थर, खिडक्यांचे बसवलेले ग्रील, इमारतीचा दर्शनीय भाग यामध्ये लिफ्टचा काही भागांवर ग्रँडर चालवून तोडून काढला आहे. या बांधकामात अक्षम्य चुका झाल्याने ही तोडफोडीची वेळ बँकेवर आल्याचे अधोरेखित झाले आहे. यातून पाण्यासारखा पैसे वाया जात आहे.
जुनी इमारत जीर्ण झाल्याने 2018 मध्ये ही इमारत पाडण्यात आली होती. याला पाच वर्षे उलटले, तरी शाखेचे काम सुरूच आहे. कामाकडे पाहिल्यास किती नियोजनशून्य व दर्जाहीन झाले आहे याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. तळमजल्यातील काम तर भल्याभल्यांना न सुटणारे कोडेच आहे. पहिल्या कामाचा निकृष्टपणा लक्षात घेऊन दुसर्‍या ठेकेदाराला काम दिल्याचे कळते. मात्र, तरीदेखील तोडफोड सुरूच आहे.

याच शाखेला लागले ग्रहण
मुळात या इमारतीसाठी भरपूर जागा असताना साधी पार्किंगची अपेक्षित व्यवस्था करण्यात आली नाही. याचा परिणाम पुढील 30 ते 40 वर्षे या भागातील नागरिकांना भोगावा लागणार आहे. याच बँकेच्या कित्येक शाखा टुमदारपणे उभ्या असताना याच शाखेला कसले ग्रहण लागले आहे हे कळायला तयार नाही.

Back to top button