पिंपरी : आरटीओकडून रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा | पुढारी

पिंपरी : आरटीओकडून रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा

राहुल हातोले

पिंपरी : परिवहन विभागाच्या वतीने दिलेल्या आदेशानुसार शहरातील अ‍ॅटोरिक्षा चालक-मालकांनी रिक्षांचे प्रमाणीकरण करण्यास टाळाटाळ केल्याने शहरातील उपप्रादेशिक विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे. एक फेब्रुवारीनंतर दर दिवसाला 50 रुपये दंड वसूल केला आहे. यामुळे दोन महिन्यांत 45 लाख 31 हजार 850 रूपयांचे उत्पन्न परिवहन विभागाच्या तिजोरीत जमा झाले आहे.

पुणे जिल्ह्यात एक लाखाहून अधिक रिक्षा असून, पिंपरी-चिंचवड शहरात एकूण सुमारे 24 हजारांहून अधिक अ‍ॅटोरिक्षा रस्त्यावर धावत आहेत. गेल्या वर्षी सप्टेंबर ते 31 मार्च 2023 पर्यंत शहरातील एकूण रिक्षांपैकी 15 हजार 247 रिक्षांचे प्रमाणिकरण आरटीओच्या वतीने करण्यात आले आहे. मीटर प्रमाणीकरणाची मुदत तीन वेळा वाढवून दिल्यानंतरही ज्या रिक्षाचालकांनी मीटरचे प्रमाणीकरण केले नाही, त्यांच्याकडून एक फेबु्रवारीपासून 50 रुपये दंड आकारण्यात आला आहे. मार्च अखेरपर्यंत 3 हजार 337 रिक्षा चालकांकडून हा दंड आकारण्यात आला आहे. केवळ दोन महिन्यांतच 45 हजारांहून अधिक रुपये आरटीओकडून वसूल करण्यात आला आहे.

मीटरनुसार वाहतूक कमी
पुणे जिल्ह्यात मीटरनुसार रिक्षा चालतात. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात मीटरपेक्षा सीटप्रमाणे रिक्षा चालतात. मात्र, प्रमाणीकरणाची सक्ती पिंपरी-चिंचवड शहरातही करण्यात आली आहे. मीटर प्रमाणिकरणासह मीटरनुसार रिक्षा वाहतूक सुरू होईल का? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

15,247
1 सप्टेंबर 2022 ते 31 मार्च 2023 दरम्यान ऑटो रिक्षांचे पुनःप्रमाणीकरण करण्यात आलेल्या रिक्षांची संख्या

3,337
1 फेब्रुवारी 2023 नंतर ऑटो रिक्षांचे पुनःप्रमाणिकरण करतेवेळी तडजोड शुल्क वसूल केलेल्या रिक्षांची संख्या

45,31,850
वसूल करण्यात आलेली तडजोड शुल्काची रक्कम

8753
उर्वरित अ‍ॅटो रिक्षांची संख्या

25 रुपये
प्रमाणिकरणानंतर भाडे दर ः
पहिल्या दीड किलोमीटरसाठी

17 रुपये

त्यानंतर दर किलोमीटरसाठी

प्रमाणिकरणासाठी आरटीओने दिलेली मुदतवाढ करून देण्यात यावी. तसेच आकारलेल्या दंडामधूनही रिक्षाचालकांची सुटका करण्यात यावी.

                – बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष,अ‍ॅटोरिक्षा- टॅक्सी-बस फेडरेशन

Back to top button