पिंपरी : मॉकड्रिलने पालिकेतील त्रुटी उघड | पुढारी

पिंपरी : मॉकड्रिलने पालिकेतील त्रुटी उघड

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिका भवनामधील चौथ्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाजवळील कक्षाला अचानक आग लागली. सायरनचा आवाज, धुराचे लोट पाहून अधिकारी, कर्मचारी भवनातून बाहेर पडले. आग विझविण्यासाठी अग्निशमन बंब दाखल झाले. त्यांनी तत्परतेने आगीवर नियंत्रण मिळवले. हे चित्र पालिका भवनात बुधवारी (दि.19) दुपारी तीनच्या सुमारास अग्निशमन विभागाने घेतलेल्या मॉकड्रिलमुळे पाहायला मिळाले. मात्र, या मॉकड्रिलमध्ये अनेक त्रुटी उघड झाल्या आहेत.

कार्यालयीन इमारतीत आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी उपलब्ध असलेल्या यंत्रणांमधील आपत्कालीन समन्वय व बचाव करण्याकामी करण्याची कार्यवाही याबद्दल माहिती व्हावी. या उद्देशाने मॉकड्रिल घेण्यात आले. अग्निशामक दल, पोलिस सुरक्षा दल, तसेच, इमारतीतील अधिकारी, कर्मचारी व नागरिक या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते. अग्निशामक दलाचे 3 बंब, 2 फायर फायटर मोटार बाईक, 2 रुग्णवाहिका, 2 पाण्याचे टँकर यांचा वापर या मॉकड्रिलमध्ये करण्यात आला.

यसंदर्भात उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले की, आगीची सूचना मिळताच अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित झाल्या. इमारतीतील 627 अधिकारी, कर्मचारी व 40 नागरिकांना 8 मिनिट 3 सेकंदामध्ये सुखरूप बाहेर काढण्यात आले. सावधानता म्हणून वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दरम्यान 3 मिनिटांमध्ये अग्निशमन पथक बंबासह घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिकादेखील दाखल झाल्या. 15 ते 20 मिनिटांमध्ये आगीवर नियंत्रण मिळवून संपूर्ण आग विझवण्याचे हे प्रात्यक्षित पूर्ण करण्यात आले.

बाहेर पडण्यास कर्मचार्‍यांना लागला अधिक वेळ
या मॉकड्रिलमध्ये पालिका भवनातील काही त्रुटी समोर आल्या. पाच मिनिटांच्या आत सर्व अधिकारी व कर्मचार्‍यांनी पायर्‍याद्वारे खाली मोकळ्या जागेत येणे अपेक्षित होते. मात्र, पालिका भवन खाली होण्यास 12 मिनिटे 13 सेकंदाचा वेळ लागला.
तसेच, अलार्मचा आवाज खूपच बारीक होता. पहिल्या मजल्यावर लावलेली जाळी कमकुवत झाल्याचे आढळून आले.
धुरामुळे अनेकांना जीना दिसत नसल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पालिका भवनाच्या आपत्तकालीन व्यवस्थापनातील त्रुटीचा अहवाल यशदाचे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे माजी संचालक कर्नल विश्वास सुपनेकर हे सादर करणार आहेत.

Back to top button