पिंपरीत कोविडने वृद्ध महिलेचा मृत्यू | पुढारी

पिंपरीत कोविडने वृद्ध महिलेचा मृत्यू

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवडमधील एका खासगी रुग्णालयामध्ये कोविडने 75 वर्षीय ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला आहे. रुग्णाच्या मृत्यूचे यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीने अन्वेषण केले आहे. संबंधित महिलेला किडनीचा आजार, मधुमेह, उच्च रक्तदाब व संधिवात हे जुने आजार देखील होते. त्यामुळे कोवीडमुळे मृत्यू हे केवळ प्रासंगिक निदान असल्याचे समितीने म्हटले आहे.

रुग्ण महिलेला दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्यासाठी 9 एप्रिल रोजी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 10 एप्रिलला महिलेच्या दोन्ही गुडघ्यांचे प्रत्यारोपण करण्यात आले. त्यानंतर 12 तारखेला रुग्णालयात उपचार घेत असताना महिलेला श्वसनाचा त्रास सुरु झाला. 13 तारखेला महिलेचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला.

14 तारखेला तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहरामध्ये सध्या कोविडचे 164 सक्रिय रुग्ण आहेत. गृहविलगीकरणात 162 रुग्णांवर उपचार सुरु आहे. तर, 1 जानेवारीपासून आत्तापर्यंत गेल्या साडेतीन महिन्यांत कोविडने दोघांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सहायक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.

Back to top button