संतापजनक : मृत रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास | पुढारी

संतापजनक : मृत रुग्णाच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास

पुणे; पुढारी वृत्तसेवा : उपचारापूर्वीच रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर चोरट्याने त्याच्या गळ्यातील 70 हजारांची सोनसाखळी चोरून नेल्याची घटना 25 मार्चला वानवडीतील एका क्लिनिकमध्ये घडली. चोरीप्रकरणी रुग्णालयातील वॉडबॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मारुती किसन भालेराव (वय 36, रा. आझादनगर, वानवडी) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दीपक चंदू परदेशी (वय 60 रा. वैदूवाडी, हडपसर) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

फिर्यादी दीपक यांचे भाऊ आकाश परदेशी हे 25 मार्चला वानवडीतील जगतापनगर परिसरातून जात असताना चक्कर आल्यामुळे ते खाली पडले. त्यामुळे नागरिकांनी आकाश यांना एका क्लिनिकमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर दीपक हे रुग्णालयात पोहोचले.

त्या वेळी त्यांनी आकाशच्या गळ्यात सोन्याची चेन पाहिली होती. त्यानंतर डॉक्टरांना माहिती देईपर्यंत मयत आकाशच्या गळ्यातील 70 हजारांची सोनसाखळी चोरट्याने चोरून नेली. अंत्यविधी उरकल्यानंतर 28 मार्चला दीपकने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून वॉर्डबॉय मारुती भालेराव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संतोष गायकवाड तपास करीत आहेत.

Back to top button