पुणे जिल्ह्याने महसूल उद्दिष्ट ओलांडले; महसूल विभागाच्या तिजोरीत 800 कोटी | पुढारी

पुणे जिल्ह्याने महसूल उद्दिष्ट ओलांडले; महसूल विभागाच्या तिजोरीत 800 कोटी

दिगंबर दराडे

पुणे : शासनाने जिल्हा प्रशासनाला 2022-23 या वर्षासाठी 515 कोटी रुपयांचे महसूल वसुलीचे उद्दिष्ट दिले होते. मात्र, जिल्हा प्रशासनाने उद्दिष्टपूर्ती करून 800 कोटी रुपये शासनाच्या तिजोरीत जमा केले आहेत. वसुलीची एकूण टक्केवारी 155.17 टक्के एवढी झाली आहे. गौणखनिजातून मोठ्या प्रमाणात शासनाला महसूल प्राप्त झाला आहे. यामध्ये प्रामुख्याने 172 कोटी रुपयांचे उद्दिष्ट असताना तब्बल 244 कोटी रुपये महसूल गोळा झाला असल्याची माहिती तहसीलदार सुनील शेळके यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना दिली.

विभागीय आयुक्त आणि शासनस्तरावरून प्रत्येक जिल्ह्याला प्रत्येक वर्षी महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात येते. मागील वर्षाकरिता शासनाने पुणे जिल्ह्याला 515 कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते. ही वसुली वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आणि निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अजय मोरे यांनी वारंवार बैठका घेतल्या. यामुळे यात वाढ झाली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मार्चअखेरपर्यंत विविध विभागांतून करवसुली सुरू होती. प्रामुख्याने अ पत्रक आणि ब पत्रकावर अधिकार्‍यांकडून भर देण्यात आला होता.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी कर्मचार्‍यांच्या बैठका घेऊन वसुली वाढविण्यासाठी तहसीलदारांना सूचना केलेल्या होत्या. वेळेत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांनीही परिश्रम घेतले. यामुळे शासनाच्या तिजोरीत आठशे कोटी रुपये जमा झाले आहेत. 2023-24 करिता शासनाचे नवीन उद्दिष्ट लवकरच जाहीर होणार आहे. पुढील वर्षी पुणे जिल्हा हजार कोटींचा टप्पा ओलांडेल, असा अंदाज वरिष्ठ अधिकार्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रामुख्याने जिल्हा परिषद उपकर, पंचायत समिती उपकर, जमीन महसूल, एसटी महामंडळ, अकृषिक कर शिक्षण कर मोजणी फी, वाळू लिलावात मिळणारी रक्कम गौणखनिज परवाने, अवैध गौणखनिज वाहतुकीतून वसुली महालेखाकार जप्त केलेल्या वाळू लिलावातून मिळणारी रक्कम शासकीय यंत्रणेकडून वसुली या सर्व प्रकरांतून शासनाला महसूल मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अवैध गौणखनिज रोखण्यासाठी कारवाई करण्यात आली. याचा फायदा महसूल वाढीसाठी झाला. आर्थिक वर्षाच्या सुरुवातीपासूनच महसूल वसुलीचे योग्य नियोजन करण्यात आले होते. याचा फायदा झाला. यामुळे वसुलीचे उद्दिष्ट साध्य करता आले.
                                            – डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी.

जिल्हाधिकार्‍यांनी केलेल्या सूचनांचे पालन करण्यात आले. शासनाच्या सर्व विभागातील कर्मचार्‍यांनी आणि अधिकार्‍यांनी योग्य प्रकारे भूमिका बजावल्यामुळे शासनाला उद्दिष्ट गाठता आले.
                                 – हिम्मत खराडे, निवासी उपजिल्हाधिकारी

Back to top button