पुणे: उन्हाच्या तीव्रतेने मेंढपाळ धास्तावले, चारा आणि पाण्यासाठी हाल | पुढारी

पुणे: उन्हाच्या तीव्रतेने मेंढपाळ धास्तावले, चारा आणि पाण्यासाठी हाल

सोमेश्वरनगर (पुणे), पुढारी वृत्तसेवा: उन्हाची तीव्रता वाढल्याने बारामती तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. तसेच, शेळ्या-मेंढ्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. चारा आणि पिण्याच्या पाण्यासाठी हाल होत आहेत.

वाढत्या उन्हाने मेंढपाळ धास्तावले असून, दुपारच्या सत्रात झाडांच्या सावलीचा आधार घेतला जात आहेत. उन्हामुळे लहान कोकरे मृत्युमुखी पडण्याची शक्यताही मेंढपाळांना सतावत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. सकाळच्या सत्रातच शेळ्या-मेंढ्या चरण्यासाठी बाहेर काढल्या जात आहेत. शेतातील गव्हाची काढणी पूर्ण झाल्याने शेळ्या-मेंढ्या त्यावर अवलंबून आहेत. मात्र, पुढील महिन्यात चार्‍याची टंचाई जाणवणार आहे.

वन विभागाच्या हद्दीतील गवत पूर्णपणे जळाले असून, पाण्याची तळीही पूर्ण आटण्याच्या मार्गावर आहेत. एप्रिलपर्यंत कशीतरी तहान भागेल; मात्र मे महिन्यात चारा आणि पाण्याचे दुर्भिक्ष जाणवणार आहे. सोमेश्वरनगर परिसरातील छोटी तळी कोरडी पडली आहेत. ओढ्यात रासायनिक पाणी असल्याने मेंढपाळ निरा डावा कालवा आणि त्यातून वाहणार्‍या फट्यांचा उपयोग करून शेळ्या-मेंढ्यांची तहान भागवत आहेत.

बारामती तालुक्यातील जिरायती भागात मेंढपाळांची संख्या जास्त आहे. चार्‍याचा प्रश्न गंभीर झाल्याने अनेक मेंढपाळ चार्‍याच्या शोधात बागायती पट्ट्यात दाखल होत आहेत. तरकारी पिकांना चांगला दर नसल्याने अनेक मेंढपाळ पिके खायला घालून शेळ्या-मेंढ्या जगवत आहेत. बागायती पट्ट्यात सध्या काही प्रमाणात चारा उपलब्ध असला, तरी तो पुरेसा नाही. येणार्‍या काळात जनावरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे.

Back to top button