कोथरूडहून मुळशीकडे जाणारा भुयारी मार्ग खुला | पुढारी

कोथरूडहून मुळशीकडे जाणारा भुयारी मार्ग खुला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : चांदणी चौक प्रकल्पामध्ये कोथरूड व सातारा रस्त्याने मुळशीकडे जाण्यासाठी बांधण्यात आलेला भुयारी मार्ग सोमवारी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. या भुयारी मार्गात दोन्ही बाजूला, तसेच छतावर आकर्षक रंगसंगतीची भित्तीचित्रे चितारली असल्यामुळे, वाहनचालकांना या मार्गावरून जाताना सुखद अनुभव आला. बावधनकडून कात्रजच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना यापुढे चांदणी चौकात येण्याची आवश्यकता भासणार नाही. त्यांच्यासाठी अडीचशे मीटर लांबीचा स्वतंत्र उड्डाणपूल बांधला आहे. त्या उड्डाणपुलावरून वाहने काही अंतरावर पुढे द्रुतगती मार्गावर उतरतील. बावधनकडून येणार्‍या वाहनांना थेट कात्रजकडे जाण्याचा हा पूल सोमवारी सुरू करण्यात आला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांच्या हस्ते या दोन्ही मार्गावरील वाहतूक सोमवारी सुरू करण्यात आली. या वेळी प्राधिकरणाचे तांत्रिक व्यवस्थापक अंकित यादव, वाहतूक पोलिस निरीक्षक राम राजमाने, विशाल पवार या वेळी उपस्थित होेते. भुयारी मार्गाची लांबी सुमारे 850 मीटर आहे. त्यापैकी 250 मीटरचा भाग हा पूर्णपणे आच्छादित आहे. कात्रजच्या दिशेने येणार्‍या वाहनांना चांदणी चौकात मुळशीकडे जाण्यासाठी रॅम्प बांधण्यात आला आहे. तेथून, तसेच कोथरूडकडून येणार्‍या वाहनांसाठी हा भुयारी मार्ग सोयीचा ठरला आहे.

Back to top button