मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याने कुणालाही आडवे टांगणार का : आ. दिलीप मोहिते पाटील | पुढारी

मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असल्याने कुणालाही आडवे टांगणार का : आ. दिलीप मोहिते पाटील

राजगुरूनगर: पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक झाला म्हणजे काय कुणालाही आडवे टांगणार का? आम्ही हे खपवुन घेणार नाही असा सज्जड इशारा पुणे-नाशिक महामार्गाच्या कामावरून ठेकेदार टी अँड टी कंपनीच्या मालकांना खेडचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी दिला. टी अँड टी अर्थात तांदळे आणि थोरात पैकी पार्टनर थोरात हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जवळचे नातेवाईक आहेत. भीडभाड न ठेवता आमदार मोहिते पाटील यांनी या ठेकेदाराच्या कामगार, अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दांत सुनावले आहे.
पुणे-नाशिक महामार्गावरील राजगुरूनगर बाह्यवळण काम जवळपास पुर्ण झाले आहे. काही दिवसांत टोल आकारणी सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र वरची भांबुरवाडी, तुकाईवाडी परिसरात सेवारस्त्याची कामे ठेकेदाराने अपुर्ण ठेवली आहेत. शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. घर एका बाजूला तर शेती विरुद्ध बाजुला किंवा अर्धे क्षेत्र इकडे आणि अर्धे पलीकडे अशी अनेक शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. पुर्वी वापरात असलेला रस्ता बाह्यवळणात गायब झाला.
त्यामुळे वाळुंज वस्तीतील जवळपास दोनशे घरांकडे जाणारा मार्ग बंद झाला आहे. महिला, लहान शाळकरी मुलांचे येणे-जाणे खडतर व धोकादायक बनले आहे. अनेकदा निवेदन दिले मात्र ग्रामस्थांना अधिकारी, ठेकेदारांनी दाद दिली नाही. एवढेच काय दोन महिन्यांपूर्वी तालुक्याचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी ग्रामस्थांच्या आग्रहाखातर ठेकेदार टी अँड टी कंपनीच्या प्रमुखांसाह महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय कदम यांची एकत्रित बैठक घेतली. आश्वासन दिले मात्र कारवाई झाली नाही. म्हणून सोमवारी (दि १० ) आमदार मोहिते पाटील व दोन्ही गावच्या नागरिकांनी थेट महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
यावेळी बोलताना आमदार मोहिते पाटील यांनी थेट मुख्यमंत्र्यांचा नातेवाईक असलेल्या ठेकेदार कंपनीच्या थोरातांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी पोलिसांनी बाह्यवळण रस्त्यावरील वाहतूक राजगुरूनगर शहरातील जुन्या रस्त्यावर वळवली. तरीही महामार्गावर वहातुक कोंडी झाली होती. त्यात प्रवासी, रुग्णवाहिकेतील रुग्ण अडकुन राहिले. रास्ता रोको दरम्यान भांबुरवाडीचे सरपंच विजय थिगळे, सुभाष गाढवे, प्रवीण कोरडे, किशोर रोडे, माजी सरपंच सुर्वे पाटील यांच्यासह ग्रामस्थ, आक्रमक महिला भगिनी उपस्थित होते.

Back to top button