गुन्हेगारी रोखण्यासाठी असावी सीसीटीव्हीची नजर | पुढारी

गुन्हेगारी रोखण्यासाठी असावी सीसीटीव्हीची नजर

नितीन वाबळे

मुंढवा : किरकोळ कारणावरून सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये वाहने फोडण्याचे प्रकार घडले आहेत. अशा घटना शक्यतो मध्यरात्री घडत असल्याने गुन्हेगारांना पकडणे अवघड होत आहे. यामुळे मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क, केशवनगर, रामटेकडी, हडपसर व रामटेकडी औद्योगिक वसाहत परिसरातील रस्त्यांसह सोसायट्यांत सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

महापालिका प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र, त्याचा आतापर्यंत किती उपयोग झाला, हा एक प्रश्नच आहे. सोसायट्या आणि मॉलमधील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांना पकडणे पोलिसांना शक्य होत आहे. सीसीटीव्ही बसविण्याची वारंवार चर्चा होत असली, तरी त्याची अंमलबजावणी प्रशासनाकडून काही मोजक्याच ठिकाणी झालेली दिसत आहे.

काही ठिकाणी सीसीटीव्ही बसविले असले, तरी त्यांचा दर्जा सुमार असल्यामुळे ते असून नसल्यासारखे असल्याचे नागरिकांनी सांगितले.
बी. टी. कवडे रस्ता, देवकी पॅलेस, रिलायन्स फ्रेश आणि कलाशंकरनगर परिसरात बँका, एटीएम सेंटर, पतसंस्था, मॉल, दुकाने, सोसायट्या असल्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. मात्र, परिसरातील रेल्वे उड्डणपुलाजवळ एकच सीसीटीव्ही बसविण्यात आला असून, तोदेखील नादुरुस्त आहे.

रामटेकडी हा संवेदनशील परिसर असून, रामनगर येथील एक आणि इतर दोन-तीन खासगी दुकानदारांनी बसविलेले सीसीटीव्ही वगळता अन्य ठिकाणी ते बसविलेले नाहीत. अंधशाळा, विठ्ठल मंदिर, मोठी मशीद, महापालिकेची शारदाबाई लोंढे शाळा, वंदे मातरम चौक, अण्णा भाऊ साठे उद्यान ही वर्दळीची ठिकाणे असून या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

या ठिकाणी गरज…

सोसायट्या, उद्याने, मॉल, हॉटेल, रुग्णालये, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये, प्रमुख चौक, गर्दीची ठिकाणे, वाहन पार्किंग, सोन्या-चांदीसह इतर दुकानांमध्ये व परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची गरज आहे.

परिसरात ज्या ठिकाणी सीसीटीव्ही नादुरुस्त असतील, ते दुरुस्त केले जातील. तसेच ज्या ठिकाणी नव्याने बसविणे आवश्यक आहे, तेथेही बसविले जातील.

                   – मंगल मारतळेकर, अधिकारी, विद्युत विभाग,
                         ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय.

घोरपडी परिसरातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिकेने बंद असलेले सीसीटीव्ही त्वरित दुरुस्त करावेत. तसेच नव्याने बसविण्यात येणारे सीसीटीव्ही दर्जेदार असावेत.

 -अतुल कवडे, अध्यक्ष (प्रभाग 21), शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

Back to top button