उजनी धरणातील जलीय परिसंस्था धोक्यात; प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या प्रजातीवर परिणाम | पुढारी

उजनी धरणातील जलीय परिसंस्था धोक्यात; प्रदूषणामुळे पक्ष्यांच्या प्रजातीवर परिणाम

प्रवीण नगरे, पळसदेव : वाढत्या प्रदूषणामुळे उजनी धरणातील जलीय परिसंस्था धोक्यात आली आहे. पुणे शहर व जिल्ह्यातील नदीकाठच्या शहर, गावांच्या परिसरातील सांडपाणी व औद्योगिक वसाहतीतील रसायनयुक्त पाणी कोणतीही प्रक्रिया न करता थेट भीमा नदीत सोडले जाते. त्यानंतर ते उजनी जलाशयामध्ये मिसळते. या कारणामुळे जलाशयातील पाणी दूषित झाले आहे. प्रदूषित पाण्यामुळे नानाविध जलचर व पक्ष्यांचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

स्थलांतरित पक्षी संकटात
भीमा नदीच्या अथांग पात्रात विविध जातींचे पक्षी पहावयास मिळतात. हिवाळ्यात परदेशातून येणार्‍या पक्ष्यांची धरण परिसरात रेलचेल असते. मात्र, पाणी प्रदूषणामुळे यावर्षी स्थलांतरित पक्ष्यांची संख्या रोडावली. पक्ष्यांचे प्रमुख खाद्य असलले विविध प्रजातींचे मासे, खेकडे, जलकीटक, मृदुकाय प्राणी, शेवाळे इत्यादी घटकांवर प्रदूषित पाण्याचा परिणाम झाला आहे. त्यांची वाढ खुंटल्याने पक्ष्यांना पुरेशा प्रमाणात खाद्य उपलब्ध होईनासे झाले आहे.

मासेमारी धोक्यात
उजनी पाणलोट क्षेत्रात व भीमा नदीच्या पात्रात मासेमारीचा मोठा व्यवसाय चालतो. प्रदूषित पाण्यामुळे मासेमारीचा व्यवसाय करणार्‍यांना विविध संकटांना तोंड द्यावे लागते आहे. पाणलोट क्षेत्रात बर्‍याच ठिकाणी साठलेल्या पाण्यावर दुर्गंधीयुक्त हिरवट…. आल्याने मत्य व्यावसायिकांच्या आरोग्यावर परिणाम दिसून येत आहेत. पाण्याच्या स्पर्शाने शरीराला खाज सुटणे व त्वचेचे विकार होत आहेत.

मानवनिर्मित प्रदूषणामुळे उजनी जलाशयातील पाणी विषारी बनले आहे. हे पाणी पिण्यास पाळीव प्राण्यांसह मानवालाही हानिकारक आहे. रसायनयुक्त पाण्यात माशांसह इतर जलचरांना आवश्यक असलेले सूक्ष्म अन्न, प्लवंग (प्लँक्टन) ची वाढ होत नाही. प्रदूषित पाण्यात प्राणवायूसह इतर पोषक घटकांची कमतरता असल्यामुळे माशांची पुरेशी वाढ होत नाही. धरणात मिसळणार्‍या पाण्यावर वैज्ञानिक पद्धतीचे प्रक्रिया करणे आवश्यक आहे व जलाशयातील पाण्याची योग्य निगा राखणे आवश्यक आहे.

                          – डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक.

Back to top button