पुणे : फळांचा राजा आवाक्याबाहेर; किरकोळ बाजारात डझनास येवढा भाव | पुढारी

पुणे : फळांचा राजा आवाक्याबाहेर; किरकोळ बाजारात डझनास येवढा भाव

पुणे; पुढारी वृत्तसेवा : हापूसचा हंगाम सुरू होऊन बराच काळ लोटला तरी लहरी हवामानामुळे आवक कमी असल्याने हापूसची चव सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच आहे. एप्रिल महिना सुरू होऊन दहा दिवस उलटून गेल्यानंतरही बाजारात एका डझनाचे भाव प्रतवारीनुसार सातशे ते एक हजार दोनशे रुपयांवर कायम आहेत. त्यामुळे, हापूसची चव चाखण्यासाठी पुणेकरांना खिसा चांगलाच रिकामा करावा लागत आहे.

हापूसचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, ’डिसेंबर, जानेवारीमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे मोहोर लागण्याची प्रक्रिया थांबली होती. मात्र, त्यानंतरही मोहोर चांगला लागला होता. शेतकर्‍यांना चांगल्या पिकाची अपेक्षा होती. मात्र, उष्णतेचा परिणाम पिकांवर झाला. काही फळांवर भाजून डाग पडले, तर अनेक ठिकाणी कैर्‍या झाडावरून पडल्या.

त्याचा परिणाम उत्पादनावर झाला झाल्याने बाजारात कमी प्रमाणात आंबा उपलब्ध होत आहे.’सद्य:स्थितीत बाजारात दररोज दोन ते अडीच हजार पेट्यांची आवक होत आहे. घाऊक बाजारात प्रतवारीनुसार कच्च्या हापूसला दोन हजार पाचशे ते चार हजार रुपये भाव मिळत आहे. परिणामी, किरकोळ बाजारात तयार आंबा सातशे ते एक हजार दोनशे रुपये डझन या भावाने हापूसची विक्री सुरू असल्याचे हापूसचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

असे आहेत घाऊक दर
कच्चा 4 ते 7 डझन 2500 ते 4000 रुपये
तयार 4 ते 7 डझन 3000 ते 4500 रुपये

सुरुवातीला अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे हापूसला फटका बसला. त्यानंतर तापमानात वाढ झाली. मागील आठवड्यातही 38 ते 39 अंश तापमान होते. परिणामी, झाडावरील कैर्‍या पिवळ्या होऊन जमिनीवर पडल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न घटले आहे.

                       – मकरंद काणे, शेतकरी, गणपतीपुळे, जि. रत्नागिरी.

Back to top button