शिरूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढतेय! ‘या’ नेत्यांचा पक्षात प्रवेश | पुढारी

शिरूर मतदारसंघात भाजपची ताकद वाढतेय! 'या' नेत्यांचा पक्षात प्रवेश

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भारतीय जनता पक्षाकडून बारामती लोकसभा मतदारसंघासोबतच शिरूर लोकसभा मतदारसंघदेखील तेवढाचा टार्गेट केला जात असल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राम गावडे व माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्री पलांडे यांचा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला. यामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील भाजपची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.

गेल्या दीड वर्षापासून भाजपकडून राज्यातील काही ठरावीक लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ जसा 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपासाठी टार्गेट आहे, तसाच शिरूरदेखील भाजपने टार्गेट केल्याचे वारंवार स्पष्ट होत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघ तसा पाहिला, तर शिवसेनाचा बालेकिल्ला समजला जात होता.

यामुळेच आतापर्यंत शिवसेना- भाजप युतीमध्ये हा मतदारसंघ नेहमीच शिवसेनेकडे राहिला. शिवसेना-भाजप युती तुटल्यानंतर भाजपकडून शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या मतदारसंघातदेखील जाणीवपूर्वक पक्षाची ताकद वाढविण्यास सुरुवात केली आहे. बारामती मतदारसंघाप्रमाणेच शिरूर लोकसभा मतदारसंघातदेखील केंद्रीय मंत्र्यांचे दौरे, बैठका घेणे, विविध कार्यक्रम, कार्यकर्त्यांना वेगवेगळ्या माध्यमांतून ताकद देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतील शिंदे गट बाहेर पडून भाजपसोबत गेला. यामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातील बहुतेक सर्व कट्टर शिवसैनिक माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. परंतु, शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजप आपली ताकद वाढवत असल्याने शिंदे गटामध्ये मात्र अस्वस्थता दिसत आहे. गावडे आणि पलांडे यांच्या प्रवेशामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे.

Back to top button