‘सासू’ च्या पोस्टिंगसाठी सेटिंग! ‘त्या’ अधिकाऱ्याला आयुक्तांनी घेतले फैलावर

‘सासू’ च्या पोस्टिंगसाठी सेटिंग! ‘त्या’ अधिकाऱ्याला आयुक्तांनी घेतले फैलावर

[author title="अशोक मोराळे" image="http://"][/author]

पुणे : साहेब… तुम्ही एस. एस. ब्रांचला येऊन काय काम करणार आहात ? ते आम्हाला सांगा. कृपया आमच्या पेशन्सशी 'खिलवाड' नको. यापुढे पोस्टिंगसाठी आम्हाला कोणाचा फोन येता कामा नये, हे लक्षात ठेवा असे म्हणत पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका पोलिस अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले.

त्याचं झालं असं, त्या अधिकाऱ्यांना 'सासू' चे (सामाजिक सुरक्षा प्रभारी विभाग) अधिकारी म्हणून काम करायचे होते. त्यासाठी त्यांनी सेटिंग लावण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, आयुक्तांना त्यांचा प्रकार काही आवडला नाही. मग काय आयुक्तांनी त्या अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावत शिस्तीत काम करण्याचा जणू इशाराच दिला.

चांगल्या पोलिस ठाण्यात प्रभारी अधिकारी म्हणून काम करण्याची अनेक अधिकाऱ्यांची इच्छा असते. त्यासाठी त्यांच्याकडून अनेकदा रेटींगचे सेटिंग केले जाते. प्रसंगी येथून तेथून शिफारशीचे फोन आणले जातात. त्यापैकी गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाचे पोस्टिंग महत्त्वाचे मानले जाते. तेथे काम करण्यासाठी अनेक अधिकारी आपले कौशल्य पणाला लावतात. शिवाय सामाजिक सुरक्षा विभागाच्या कारवाईचे क्षेत्र संपूर्ण शहरभर आहे. शहरात येथील प्रभारी अधिकाऱ्यांचा वेगळाच दरारा आहे. त्यामुळे कर्मचारीदेखील येथे काम करण्यासाठी धडपड करत असतात. मागील आठवड्यात सामाजिक सुरक्षा विभागाचे प्रभारी अधिकारी सेवानिवृत्त झाले आहेत. त्या ठिकाणी आपली वर्णी लागावी म्हणून आत्तापासूनच काही जणांनी देव पाण्यात ठेवले आहेत. सामाजिकच्या प्रभारीपदी कोण बसणार याची चर्चा शहर पोलिस दलात रंगली आहे.

अशातच एका अधिकाऱ्याने पोलिस आयुक्तांना 'सासू 'च्या पोस्टिंगसाठी कोणाचा तरी फोन आणला, मग काय आयुक्तांनी थेट त्या अधिकाऱ्याला फोन करून साहेब… तुम्ही सामाजिक सुरक्षा विभागात येऊन नेमकं काय काम करणार आहेत ते आम्हाला सांगा.. तुम्ही आमच्या पेशन्सशी 'खिलवाड' करू नका. यापुढे पोस्टिंगसाठी आम्हाला कोणाचा फोन येता काम नये, हे लक्षात ठेवा असे म्हणत त्या अधिकाऱ्याला चांगलेच फैलावर घेतले. पारदर्शक आणि सडेतोड कामकाजासाठी अमितेश कुमार ओळखले जातात. बदल्यांच्या बाबतीत त्यांची थेट भूमिका आहे. काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांच्याकडून प्राधान्य दिल्याचे दिसून येते. कर्मचाऱ्यांच्या बदल्या तर त्यांनी दरबार भरवून त्यांच्याच समोर करून दिल्या आहेत. त्याचबरोबर अवैध धंद्याबाबत सुरुवातीपासूनच त्यांनी कठोर भूमिका घेतली आहे. कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे पोलिस ठाण्याच्या हद्दीत खपवून घेतले जाणार नसल्याचा आयुक्तांचा इशारा आहे. अवैध धंदेवाल्यांना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष अभय देणाऱ्यांची खैर केली जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यांच्या कारवाईची अधिकारी, कर्मचाऱ्यात दहशत आहे. त्यामुळे शहरातील मलाईदार पोलिस ठाण्याचे किंवा महत्त्वाच्या शाखांचे प्रभारी अधिकारी म्हणून बसण्याच्या अनेक अधिकाऱ्यांच्या मनसुब्यांना लगाम लागल्याचे बोलले जाते आहे.

सामाजिकचा कारभार आता प्रभारीविना

सामाजिक सुरक्षा विभागाचा कारभार आता पूर्णविक प्रपारी अधिकाऱ्यांशिवाय चालणार आहे. पोलिस आयुक्तांकडून या विभागात अधिकाऱ्याचे पोस्टिंग केले जाणार नसल्याची माहिती आहे. तसे गुन्हे शाखेच्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील सुचित केले आहे. दरम्यान, तत्कालीन पोलिस आयुक्त डॉ. के. आफ रकार्ड व्यंकटेशम यांनी देखील त्यांच्या कार्यकाळात सामाजिक सुरक्षा विभागाला अधिकारी न देता कामकाज सुरू ठेवले होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news