व्यवसायातील स्पर्धा अन् बदनामीच्या कारणातून खून, तांबेवाडी सोसायटी संचालकाच्या खुनाचे उलगडले रहस्य | पुढारी

व्यवसायातील स्पर्धा अन् बदनामीच्या कारणातून खून, तांबेवाडी सोसायटी संचालकाच्या खुनाचे उलगडले रहस्य

नारायणगाव (पुणे), पुढारी वृत्तसेवा: बेल्हे (ता. जुन्नर) जवळील तांबेवाडी येथील विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक किशोर तांबे यांचा खून करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व आळेफाटा पोलिस यांनी संयुक्तरीत्या कामगिरी करत पकडले. व्यावसायिक स्पर्धा आणि बदनामीच्या कारणातून हा खून करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिली.

पांडुरंग जिजाभाऊ तांबे (वय ३९, रा. तांबेवाडी बेल्हे, ता. जुन्नर) व महेश गोरखनाथ कसाळ (वय ३०, रा. आळेफाटा, ता. जुन्नर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयितांची नावे असून संतोष खंडू तांबे यांनी याबाबत फिर्याद दिली होती.

संतोष तांबे यांच्या फिर्यादीनुसार ५ एप्रिल रोजी रात्री साडे सातच्या सुमारास त्यांचा चुलत भाऊ किशोर कोंडिभाऊ तांबे (वय ४०, रा. तांबेवाडी, ता. जुन्नर) हा शेतात जातो असे सांगून निघून गेला; मात्र ताे परत आला नाही. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व आळेफाटा पोलिसांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. तपासादरम्यान पांडुरंग तांबे व महेश कसाळ यांनी हा खून केल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी व्यवसायातील प्रतिस्पर्धा तसेच बदनामी केल्याचा राग मनात ठेवून कट केला. नंतर किशोर तांबे याला दारू पाजून त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड घालून त्याचा खून केला आणि मृतदेह मुरलीधर पिंगळे यांच्या विहिरीत टाकल्याचे सांगितले. दरम्यान पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून, या गुन्ह्याचा तपास आळेफाटाचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर हे करीत आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

Back to top button