बेल्हे सोसायटीच्या बेपत्ता संचालकांची हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात | पुढारी

बेल्हे सोसायटीच्या बेपत्ता संचालकांची हत्या; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

बेल्हे; पुढारी वृत्तसेवा : बेल्हे सोसायटीचे बेपत्ता संचालक किशोर तांबे यांचा मृतदेह शुक्रवारी (दि. 7) सकाळी तांबेवाडी स्मशानभूमीजवळील विहिरीत आढळला. संशयित आरोपी पांडुरंग तांबे याने बुधवारी (दि. 5) रात्री किशोर कोंडीभाऊ तांबे यांची हत्या करून मृतदेह तांबेवाडी स्मशानभूमीजवळ कुकडी डावा कालव्यालगत असलेल्या विहिरीत टाकल्याची कबुली पोलिसांना दिली.

ग्रामस्थ व पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊ वाजता किशोर तांबे हे शेतात जाऊन येतो, असे सांगत घरातून बाहेर पडले. परंतु, घरी न आल्याने ते बेपत्ता झाल्याची फिर्याद त्यांचे चुलतभाऊ संतोष तांबे यांनी आळेफाटा पोलिस ठाण्यात दिली. तपास करीत असताना सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांनी संशयित म्हणून पांडुरंग तांबे याच्यासह दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.

प्राथमिक चौकशीत त्यांनी पोलिसांची दिशाभूल केली. उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जवळे, पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे, बडगुजर यांनी सखोल चौकशी केल्यानंतर संशयित पांडुरंग तांबे याने बुधवारी रात्री किशोर तांबे यांची हत्या करून मृतदेह तांबेवाडी स्मशानभूमीजवळ कुकडी डावा कालव्यालगत असलेल्या विहिरीत टाकल्याची कबुली दिली. बडगुजर यांनी शुक्रवारी सकाळी ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढला. पंचनाम्यानंतर तांबे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन आळे प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.

सायंकाळी तांबेवाडी स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पांडुरंग तांबे याने किशोर तांबे यांची हत्या कशासाठी केली? या प्रकरणात आणखी किती साथीदार होते? याचा शोध बडगुजर घेत आहेत. किशोर तांबे यांच्या हत्येत सहभागी असलेल्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे (ठाकरे) तालुका उपप्रमुख मोहन बांगर, शांताराम सावंत यांनी केली आहे.

Back to top button