भोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान | पुढारी

भोर तालुक्यात अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे नुकसान

भोर; पुढारी वृत्तसेवा : भोर तालुक्याच्या दक्षिण भागात गुरुवारी (दि. 6) दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले. पिकांची जमवाजमाव करण्यासाठी शेतकर्‍यांची धांदल उडाली. तालुक्यात प्रामुख्याने पावसाच्या पाण्यावर शेती अवलंबून आहे. खरिपात भात तर रब्बीत ज्वारी व गहू ही प्रमुख पिके घेतली जातात.

सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, गहू, हरभरा, तसेच अन्य पिकांची काढणी झाली असून बहुतांशी शेतकर्‍यांची पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे वातावरण तयार झाल्याने जनावरांचा चारा, कडबा जमा करण्याची लगबग झाली होती. मात्र, दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामध्ये ज्वारीचा कडबा भिजून शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे. काही शेतकर्‍यांची ज्वारी काढणी राहिली असल्याने ज्वारी कापणीच्या कामात ते व्यस्त असताना ज्वारी भिजली. गव्हाच्या पिकाची मळणी करत असताना अचानक पाऊस आल्यामुळे भरडी मशीन कामे थांबली.

कडब्याचे भाव गगनाला
मागील दोन वर्षांच्या तुलनेत यंदा ज्वारीच्या उत्पन्नात घट झाली असल्याने जनावरांचा चारा (कडबा) शेतकर्‍यांना कमी मिळाला आहे. यामुळे यंदा कडब्याच्या एका पेंढीला 20 रुपये म्हणजे शेकडा 2 हजार रुपये कडब्याचा भाव झाला आहे. यामुळे कडब्याचे भाव गगनाला भिडल्याचे शेतकरी दीपक गोळे यांनी सांगितले.

Back to top button