पुणे : चक्क भिकारी बनून मोबाईल शॉपी फोडली | पुढारी

पुणे : चक्क भिकारी बनून मोबाईल शॉपी फोडली

पुणे; पुढारी वृत्तसेवा : भिकार्‍याचा वेष धारण करून मोबाईल शॉपी फोडणार्‍या एकासह मोबाईल विकत घेणार्‍या दोघांना लष्कर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या घटनेत चोरी केलेल्या 18 लाखांच्या मोबाईलपैकी साडेनऊ लाखांचे मोबाईल पोलिसांकडून जप्त करण्यात आले आहेत. असीम शब्बीर शाह (वय 23) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याचा मोबाईल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तर चोरीचा मोबाईल विकत घेतल्याप्रकरणी केदार शिंदे यालाही अटक केली आहे.

लष्कर पोलिस ठाण्यात मोबाईल शॉपीमालक रितेश श्याम नवले यांनी फिर्याद दिली होती. त्यांच्या महात्मा गांधी रस्त्यावरील मोबाईल शॉपीमधून 22 जानेवारी रोजी चोरी झाली होती. दुकानाचे शटर तसेच मेन बिल्डींगचे शटरचे लॉक तोडून दुकानातील सॅमसंग कंपनीचे 18 मोबाईल, एक लॅपटॉप आणि रोख 6 लाख रुपये असा एकूण 18 लाख 10 रुपयांचा माल चोरीस गेला होता. या गुन्ह्याचा तपास करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये असिम शाह दुचाकी गाडी दूर अंतरावर पार्क करून भिकार्‍याचा वेष धारण करून दुकानाबाहेर झोपल्याचे दिसले. यानंतर मध्यरात्री दुकानाचे शटर कटावणीने उचकटून त्याने चोरी केली.

दरम्यान, चोरीस गेलेले सर्व मोबाईलचे आयएमईआय नंबर ट्रेसिंगसाठी देण्यात आले होते. केदार शिंदे (रा. लोहियानगर) याने चोरीच्या मोबाईलचा वापर केल्याची माहिती प्राप्त झाली. त्याने असीम शहा याच्याकडून विकत घेतल्याचे सांगितले. त्यानुसार असिम शहा यांस एक एप्रिलला अटक केली. त्याच्याकडून 9 लाख 45 हजार रु किंमतीचे 14 मोबाईल जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलिस उपआयुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलिस आयुक्त आर. राजे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश तटकरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) प्रियंका शेळके, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, उपनिरीक्षक कांबळे, मंगेश बोर्‍हाडे यांच्या पथकाने केली.

Back to top button