कांद्यानंतर बटाट्यानेही झोपवले; आंबेगावातील शेतकर्‍यांची निराशा संपेना | पुढारी

कांद्यानंतर बटाट्यानेही झोपवले; आंबेगावातील शेतकर्‍यांची निराशा संपेना

लोणी-धामणी; पुढारी वृत्तसेवा : कांद्याने रडवले आणि बटाट्याने झोपवले. सांगा शेतकर्‍यांनी जगायचे कसे? असा उद्विग्न सवाल आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकरी करीत आहेत. लाखणगाव, देवगाव, जारकरवाडी, पोंदेवाडी, वाळुंजनगर, लोणी, धामणी, वडगावपीर, मांदळेवाडी या भागांत कांद्याबरोबरच मोठ्या प्रमाणात बटाट्याचे पीक घेतात. काद्यांची काढणी सुरू आहे.

मात्र, अल्प भावाने शेतकरी निराश आहे. अशातच आता बटाटा काढणीही सुरू आहे. पण, बटाट्यालाही भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. मांदळेवाडी येथील शेतकरी हनुमान आदक, फकिरा आदक, नवनाथ आदक यांनी बटाटा शेतातच सात रुपये किलोने विकला.

खराब वातावरणामुळे बटाटा उत्पादनात घट
यंदा खराब वातावरणामुळे बटाट्याच्या पन्नास किलो पिशवीला फक्त नऊ ते दहा पिशव्या उत्पादन होत आहे. त्यामुळे आधीच शेतकर्‍याचा तोटा झाला आहे. भरीस भर किलोला फक्त 7 रुपये इतका दर मिळत असल्याने ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी स्थिती झाली आहे. परिणामी, यंदा कांद्यापाठोपाठ बटाट्यानेही शेतकर्‍यांची पुरती निराशा केली आहे. शेतकर्‍यांच्या कोणत्याच मालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी पुरता आर्थिक अडचणीत सापडल्याचे पोपट आदक यांनी सांगितले.

Back to top button