…तरी भरपाई देणे बंधनकारक; विमा कंपनीचा दावा फेटाळला | पुढारी

...तरी भरपाई देणे बंधनकारक; विमा कंपनीचा दावा फेटाळला

पुणे; पुढारी वृत्तसेवा : अपघाती निधन झालेल्या घटनेतील दुचाकीचा विमा उतरविण्यात आलेले नव्हता, असा विमा कंपनीने केलेला दावा मोटार अपघात न्यायाधिकरणाने फेटाळून लावला. अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराच्या कुटुंबीयांना 11 लाखांची नुकसानभरपाई द्यावी. गाडीचालक, मालक आणि विमा कंपनीने संयुक्तपणे ढमाळ यांच्या कुटुंबीयांना 10 लाख 87 हजार 528 रुपये आठ टक्के व्याजदराने दावा दाखल केल्याच्या तारखेपासून द्यावेत, असा निकाल न्यायाधिकरणाचे सदस्य जे. जी. डोरले यांनी दिला.

25 ऑक्टोबर 2017 रोजी अजितकुमार ढमाळ हे सहकारनगर मधील शिंदे हायस्कूल परिसरातून त्यांच्या दुचाकीवरून जात होते. त्या वेळी अक्षय नाडकर यांनी जोरात त्यांच्या दुचाकीला धडक दिली. उपचारादरम्यान ढमाळ यांचा 8 नोव्हेंबर 2018 मध्ये मृत्यू झाला. याबाबत अजितकुमार गंगाधर ढमाळ यांच्या कुटुंबीयांनी अ‍ॅड. लिखित गांधी यांच्यामार्फत अक्षय नाडकर, अक्षय भारणे आणि विमा कंपनी आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स कंपनीविरुद्ध हॉस्पिटलमध्ये झालेला खर्च व नुकसानभरपाई मिळण्यासाठी न्यायाधिकरणात धाव घेतली होती.

युक्तिवादादरम्यान विमा कंपनीने अपघाताच्या दिवशी नाडकर यांची दुचाकी आरटीओ येथे रजिस्टर नव्हती तसेच त्या दिवशी इन्शुरन्स पॉलिसी नव्हती, असा बचाव करीत विमा रक्कम देण्यास नकार दिला. दुचाकीला तात्पुरता रजिस्ट्रेशन नंबर होता व त्यानंतर पुणे आरटीओकडून पक्का नंबरही घेतलेला होता. तसेच, या विमा अपघाताच्या दिवशीच्या मुदतीत होता, असे म्हणणे धडक दिलेल्या दुचाकीचालकाच्या मालकांनी मांडले. अर्जदार यांनी पोलिस ठाण्यातून घेतलेली पॉलिसी, इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीमध्ये नमूद पॉलिसी नंबर, गाडी नंबर, चॅसी नंबर, इंजिन नंबर एकच होता. फक्त विम्याच्या मुदतीमध्ये फेरफार करून सदर बदललेल्या तारखेचा विमा कंपनीकडून दाखल करण्यात आला, असा युक्तिवाद अ‍ॅड. गांधी यांनी केला.

Back to top button