खेड शिवापूरला पकडला 55 लाखांचा गुटखा | पुढारी

खेड शिवापूरला पकडला 55 लाखांचा गुटखा

खेड शिवापूर; पुढारी वृत्तसेवा : कारमधून गुटख्याची वाहतूक करणार्‍यावर राजगड पोलिस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली. खेड शिवापूर येथे रविवारी (दि. 2) पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्यात दोन गाडाऊनमध्ये लपवून ठेवलेला तब्बल 55 लाख 62 हजार 912 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. रमेश मोतीराम चौधरी (वय 37, रा. श्रीरामनगर, ता. हवेली) या किराणा दुकानदारास पोलिसांनी अटक केली आहे.

राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटेच्या सुमारास रमेश चौधरी कारने जात होता. राजगड पोलिसांनी त्याच्या वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये सुगंधी पानमसाला व रोख 3 लाख 45 हजार रुपये मिळून आले. अजून कोठे माल लपवून ठेवला आहे, असे विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

अधिक चौकशीत श्रीरामनगर (ता. हवेली) व शिंदेवाडी (ता. भोर) येथे वेगवेगळ्या गोडाऊनमध्ये माल लपवून ठेवल्याचे सांगितले. सदर ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सुमारे 55 लाख 62 हजार 912 रुपये किंमतीचा पानमसाला, गुटखा, सुगंधी मसाला जप्त केला. तसेच वाहन व रोख रक्कम 3 लाख 45 हजार, असा एकूण 65 लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल पंचनामा करून जप्त करण्यात आला.

राजगडचे पोलिस निरीक्षक सचिन पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ अधिकारी अविनाश शिळीमकर यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस निरीक्षक मनोजकुमार नवसरे, हवालदार संतोष तोडकर, राहुल कोल्हे, महादेव शेलार, सागर गायकवाड, अजित भुजबळ यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपनिरीक्षक प्रदीप चौधरी करीत आहेत.

Back to top button