पुणे : पालिकेला अंधारात ठेवून जलतरण तलावाचे उद्घाटन | पुढारी

पुणे : पालिकेला अंधारात ठेवून जलतरण तलावाचे उद्घाटन

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महापालिका प्रशासनाला अंधारात ठेवून माजी नगरसेवकाच्या हस्ते जलतरण तलावाचे उद्घाटन करणार्‍या ठेकेदाराला क्रीडा विभागाने नोटीस बजावली आहे. विशेष म्हणजे उद्घाटन करण्यापूर्वीही क्रीडा विभागाने हा कार्यक्रम घेऊ नये, अशी नोटीस बजावली होती. पु. ल. देशपांडे उद्यानाच्या परिसरातील सावित्रीबाई गणपत पवार जलतरण तलावाचे काम 2008 मध्ये सुरू झाले आणि 2009 मध्ये पूर्ण झाले.

तलावासाठी 70 लाख आणि वेगवेगळ्या यंत्रसामग्रीसाठी 30 लाख रुपये असा एक कोटी खर्च करण्यात आला. मात्र, राजकीय कुरघोड्या आणि प्रशासनाच्या अनास्थेमुळे हा तलाव तेरा वर्षे सुरूच झाला नव्हता. भुरट्या चोरांकडून तलावाच्या स्टाईल, फरशी, मोटार चोरीला गेल्याने दुरुस्तीसाठी वारंवार लाखो रुपये खर्च झाले. एवढे करूनही जलतरण तलाव बंदच असल्याचे वृत्त 28 मार्च रोजी दैनिक ‘पुढारी’ने प्रसिद्ध केले होते.

त्यानंतर महापालिकेने जलतरण तलावाची उर्वरित कामे करून लवकरच सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले. मात्र, ठेकेदाराने प्रशासनाची पूर्वपरवानगी न घेताच रविवारी जलतरण तलावाचे उद्घाटन माजी नगरसेवकाच्या हस्ते केले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कार्यालयाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणतेही उद्घाटन करू नये, असे आदेश दिल्यानंतरही हा प्रकार घडल्याने महापालिकेच्या क्रीडा विभागाने ठेकेदाराला नोटीस बजावली आहे.

ठेकेदाराकडून उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला जाणार असल्याचे समजल्यानंतर आम्ही संबंधित ठेकेदारास कार्यक्रम न घेण्याची नोटीस दिली होती. त्यानंतरही उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यामुळे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार पुन्हा एकदा ठेकेदाराला नोटीस बजावण्यात आली आहे.

                                चेतना केरुले, उपायुक्त, क्रीडा विभाग, महापालिका.

Back to top button