देहूत वाहनांवर पोलिसांची टोईंग कारवाई | पुढारी

देहूत वाहनांवर पोलिसांची टोईंग कारवाई

देहुगाव : देहुगाव हे तीर्थक्षेत्र असल्याने देहूत दररोज हजारो भाविकभक्त दर्शनासाठी चारचाकी दुचाकी वाहने घेऊन येत असतात. मंदिराच्या समोर असलेल्या रस्त्याच्या बाजूला जागा दिसेल तिथे वाहने लावतात. परंतु, हे भाविकभक्त मंदिरात दर्शनासाठी गेले असता, तळवड़े वाहतूक विभागाची टोइंग व्हॅन येते आणि अनधिकृत पार्किंग केलेली वाहने उचलून नेहतात. भाविकभक्त दर्शन करून आल्यानंतर वाहन गायब झाल्याचे निदर्शनात येताच त्यांचा जीव भांड्यात पडतो. मग तळवड़े येथे जावून दंडाची पावती फाडून वाहने सोडविली जात आहेत. अशा प्रकारे देहूत येणार्‍या भाविकभक्तांना पोलिस कारवाईचा करावा लागणारा सामना आणि नाहक सोसावा लागणारा भुर्दंड यामुळे भाविकभक्त नाराजी व्यक्त करीत आहेत.

देहूत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर
संत तुकोबारायांच्या दर्शनासाठी भक्तांची वाढत्या संख्येबरोबरच वाहनांची संख्याही तितकीच वाढत आहे. कामानिमित्त आणि चाकरमानी लोकांची वाहने आणि पूर्वी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम नसल्याने स्थानिक नागरिकांनी घेतलेली वाहने यामुळे वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. परिणामी वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर बनला आहे. वाहनतळाची व्यवस्था नसल्याने लोक मुख्य मंदिर ते चौदा टाळकरी कमानीदरम्यान असलेल्या रस्त्यालगत, मोकळी जागा दिसेल तिथे वाहने अनधिकृतपणे पार्किंग करतात.

पोलिसांनी मार्गदर्शक फलक लावलेत, पण..
देहू देवस्थान तसेच देहुनगर पंचायत आणि सार्वजनिक वाहतूक पोलिस विभाग यांनी एक सयुंक्त बैठक घ्यावी. चौदा टाळकरी कमान ते वैकुंठस्थान मंदिरदरम्यान असलेल्या विस्तीर्ण जागेत दुचाकी, चारचाकी वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करावी. मुख्य मंदिर ते चौदा टाळकरी कमानीदरम्यान शंभर मीटरपर्यंत नो पार्किंगचे ठळक स्पष्ट दिसणारे फलक लावावेत, चौदा टाळकरी कमान ते देहूच्या महाप्रवेशद्वारादरम्यान रस्त्याच्या दुतर्फ़ा सम विषम तारखेस पार्किंगची सोय करण्यात आली आहे. परंतु पी-वन पी-टू चे फलक हवे तसे लावण्यात आलेले नाहीत. तेही फलक ठळक अक्षरात दिसतील अशा पद्धतीने लावावेत. याबाबत जनजागृती करावी आणि मगच अनधिकृत लावलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात यावी.
अशा या कारवाईस सामोरे गेलेल्या काही त्रस्त भाविकभक्त आणि ग्रामस्थांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

कारवाईसाठी देहू संस्थानच्या वतीने पत्र
स्थानिक नगरपंचायत देहू देवस्थान संस्थानच्या वतीने अशा वाहनांवर कारवाई करणेबाबत पोलिसांना पत्र दिले असल्याचा दुजोरा देहू देवस्थान संस्थानने दिला आहे. त्यामुळे रस्त्याच्या कड़ेला अनधिकृत पार्किंग केलेली वाहने टोइंग व्हॅनद्वारे उचलून नेली जात असून, वाहतूक पोलिस दररोज कारवाई करताना दिसत आहेत.

Back to top button