पुण्यातील मंगळवार पेठेतील दोनशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कोसळले | पुढारी

पुण्यातील मंगळवार पेठेतील दोनशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड कोसळले

भवानी पेठ; पुढारी वृत्तसेवा : मंगळवार पेठेतील श्रमिकनगर परिसरात असलेल्या त्रिवेणी शांती मठातील दोनशे वर्षांपूर्वीचे वडाचे झाड उन्मळून पडले. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, मठातील मंदिरांचे नुकसान झाले आहे. चार मीटरचा घेर आणि साठ फूट उंच असलेले हे झाड कोसळल्यााची माहिती समजताच अग्निशमन जवान व महापालिकेचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मशीनच्या साहाय्याने झाडाच्या मोठ्या फांद्या हटवून परिसर रिकामा केला.

हे झाड कोसळल्याने मठातील मंदिरांचे मोठे नुकसान झाले आहे. घटना घडण्यापूर्वी सुमारे पन्नास नागरिक मठामध्ये होते. धोकादायक असलेल्या या वृक्षाबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रार केली. मात्र, या झाडाची छाटणी करण्याकडे प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे नुकसान झाल्याचे स्थानिक नागरिक महेंद्र लालबिगे यांनी सांगितले.

Back to top button