दारू पिऊन आलेल्या भाविकांवर जेजुरीत कारवाई | पुढारी

दारू पिऊन आलेल्या भाविकांवर जेजुरीत कारवाई

जेजुरी; पुढारी वृत्तसेवा : जेजुरी गडावर जाणार्‍या आपत्कालीन मार्गाच्या प्रवेशद्वारावर अरेरावी करणार्‍या पाच तळीरामांच्या गाडीवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली तसेच त्यांना पोलिस ठाण्यात नेत समज देण्यात आली. जेजुरी गडावर जाण्यासाठी असणार्‍या आपत्कालीन मार्गावरून वाहने सोडण्यासाठी नियुक्त असलेल्या कर्मचारीवर्गावर विविध क्षेत्रांतल्या माननीयांकडून दबाव येतो.

त्यामुळे धर्मादाय आयुक्तांनी घालून दिलेल्या नियम, अटींची पायमल्ली होत आहे. आपत्कालीन मार्गावरून वाहने सोडली नाहीत, तर वाहनचालक वरिष्ठ पातळीवर फोन लावतात. तसेच आमदार, खासदार, स्वीय सहायक, अधिकारी यांचे कार्ड दाखवतात. गाडी न सोडल्यास दादागिरी, शिव्यांची लाखोली वाहतात. हा प्रकार नित्याचा झाला आहे. शुक्रवारी (दि. 31) सकाळी अशीच घटना घडली.

नगर जिल्हा पासिंग असलेली कार आपत्कालीन मार्गावरील गेटवर आली. त्यांनी गाडी गडावर सोडण्याची सूचना देवसंस्थान कर्मचारीवर्गाला केली. कारमधील पाचपैकी चार जण दारू पिले होते तसेच गाडीत बियर व दारूचे बॉक्स असल्याचे निदर्शनाला आल्याने कर्मचार्‍यांनी गाडी सोडण्यास नकार दिला. त्यामुळे तिघांनी अरेरावी केली.

एक जण प्रवेशद्वार धरून बसला. कोणतीच गाडी सोडू देणार नाही, असे तो सांगू लागला. देवसंस्थान कर्मचार्‍यांनी जेजुरी पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिस उपनिरीक्षक व काही कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेत वाहनासह सर्वांना ताब्यात घेतले. पोलिस ठाण्यात आणत त्यांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई केली तसेच समज देऊन सोडून दिले.

Back to top button