पुणे : मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल | पुढारी

पुणे : मेट्रोच्या कामामुळे वाहतुकीत बदल

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळ मेट्रो मार्गाच्या वायडक्टचे काम करण्यात येणार असल्यामुळे 31 मार्च ते 21 एप्रिल दरम्यान या पुलावरून तारकेश्वर चौकाकडे जाणारी वाहतूक रात्री दहा ते सकाळी सहा दरम्यान आवश्यकतेनुसार बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना या काळात पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. महामेट्रोकडून वनाझ ते रामवाडी मार्गावर मेट्रोचे काम सुरू आहे. या मार्गावर सर्व कामे झाली असलीतरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतूजवळील वायडक्टचे काम अद्याप करण्यात आलेले नाही. आता मेट्रोकडून हे काम 31 मार्चपासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील 22 दिवस डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेतू रात्री वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

या पर्यायी मार्गाचा वापर करा…
पुणे स्टेशनकडून येरवडाकडे जाणारी वाहने मोबाज चौक, मंगलदास रोडने, ब्लू डायमंड चौक, कोरेगापार्क जंक्शन, पर्णकुटी मार्गे जातील.
पुणे स्टेशनकडून बोटक्लबकडे जाणारी वाहने मोबाज चौक, डावीकडे वळून ढोलेपाटील रोडने जातील.
बोटक्लब रोडने येऊन येरवडाकडे जाणारी वाहने श्रीमान चौकातून वळून सरळ अमृतलाल मेहता रोडने कोरेगाव पार्क चौकातून जातील.
येरवडाकडून पुणे स्टेशनकडे जाणार्‍या वाहनचालकांनी पर्णकुटी चौक, महात्मा गांधी चौक, कोरेगाव पार्क जंक्शन, ब्लू डायमंड चौकातून उजवीकडे वळून जावे.

या ठिकाणीही बदल
वनाझ ते रामवाडी मेट्रो मार्गावरील कल्याणीनगर मेट्रो स्टेशनच्या कामासाठी 28 मार्च ते 27 जून दरम्यान अ‍ॅडलब चौकाकडे व एन. एम चव्हाण चौकाकडे जाणार्‍या वाहतुकीत आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार आहे. त्यावेळी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Back to top button