पिंपरी : ‘वायसीएम’ मधील एक्स-रे मशीन बंद; रुग्णांची गैरसोय | पुढारी

पिंपरी : ‘वायसीएम’ मधील एक्स-रे मशीन बंद; रुग्णांची गैरसोय

पिंपरी : पालिकेच्या पिंपरी-संत तुकारामनगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात (वायसीएम) सध्या मोठ्या तीन एक्स-रे मशीन बंद आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे हाल होत आहेत. रुग्णालयामध्ये 5 पोर्टेबल मशीन आहेत. केवळ किरकोळ दुखापतीसारख्या व्याधीचे एक्स-रे काढण्यासाठी त्याचा वापर होत आहे.

वायसीएम रुग्णालयातील मोठ्या तीन एक्स-रे मशीन बंद असल्याने रुग्णांना एक्स-रे काढण्यासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी रुग्णांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही स्थिती पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.़ वायसीएम रुग्णालय हे शहराच्या मध्यवर्ती लोकवस्तीत आहे. तसेच, हे महापालिकेचे सर्वात मोठे आणि सर्व सुविधांयुक्त असे रुग्णालय आहे. त्यामुळे या रुग्णालयात दररोज उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे प्रमाणदेखील मोठे आहे.

नवीन डीजिटल मशीन घेणार
वायसीएम रुग्णालयासाठी नवीन डिजिटल एक्स-रे मशीन मिळावी, यासाठी रुग्णालय प्रशासनाने महापालिका प्रशासनाकडे मागणी नोंदविली आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची खरेदी होईल. त्यानंतरच ही मशीन वायसीएम रुग्णालयात दाखल होऊ
शकणार आहे.

वायसीएममधील कामाचा आयुक्तांकडून आढावा
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी बैठक घेऊन वायसीएम रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला. रुग्णालयातील स्थापत्यविषयक कामे, वॉर्डांचे नूतनीकरण, रुग्णालयाशेजारी उभारण्यात येत असलेली 11 मजली इमारत, त्यासाठी निश्चित केलेली डेडलाईन याचा आढावा घेतला. तसेच, एक्स-रे मशीन दुरुस्तीची नेमकी स्थिती जाणून घेतली. नवीन पोस्टमॉर्टेम सेंटरला भेट देऊन तेथील काम पुढील महिनाभरात पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.

अस्थिरोग विभागात जाणवते गैरसोय
तीनही मोठ्या एक्स-रे मशीन बंद असल्यामुळे वायसीएम रुग्णालयातील अस्थिरोग विभागात येणारे रुग्ण व नातेवाइकांना खुबा, मणका, पाठ, पायाचे हाड आदी अवयवांचे एक्स-रे काढण्यासाठी खासगी रुग्णालयांचा आधार घ्यावा लागत आहे. तीन एक्स-रे मशीनपैकी एका मशीनची वार्षिक देखभाल-दुरुस्ती सहा महिन्यांपासून रखडली आहे. दुसरी मशीन तीन महिन्यांपासून आणि तिसरी मशीन दोन महिन्यांपासून बंद आहे.

एका मशीनच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न
रुग्णालयात बंद स्थितीत असलेल्या एक्स-रे मशीनचे बरेच भाग नादुरुस्त अवस्थेत आहेत. तीनपैकी एक मशीन दुरुस्त होण्याची शक्यता आहे. त्याच्या दुरुस्तीचे काम सध्या सुरू आहे. अन्य दोन मशीन मात्र जुन्या पद्धतीच्या असून त्याच्या दुरुस्तीविषयी प्रश्नचिन्ह आहे.

वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्थेतील तीन एक्स-रे मशीन बंद आहेत. त्यातील 2 मशीन 2008 मधील तर, 1 मशीन 2010 मध्ये खरेदी केलेली आहे. तीन मशीनपैकी एक मशीन दुरुस्त होऊ शकणार आहे. अन्य दोन मशीन जुन्या पद्धतीच्या असल्याने 1 नवीन डीजिटल एक्स-रे मशीन मिळावी म्हणून महापालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. त्याची निविदा कार्यवाही सध्या सुरू आहे. सध्या 5 पोर्टेबल एक्स-रे मशीन रुग्णालयात चालू स्थितीत आहेत.

– राजेंद्र वाबळे, अधिष्ठाता, वायसीएम रुग्णालय पदव्युत्तर संस्था.

Back to top button