कामगार ते खासदार ! असा होता गिरीश बापट यांचा दैदीप्यमान प्रवास… | पुढारी

कामगार ते खासदार ! असा होता गिरीश बापट यांचा दैदीप्यमान प्रवास...

ज्ञानेश्वर बिजले

पुढारी ऑनलाईन: टेल्को कंपनीतील कामगार राजकीय क्षेत्राकडे वळतो आणि कार्यकर्ता, नगरसेवक, आमदार, मंत्री आणि आता खासदार पद भूषवितो. आपल्या राजकीय  कारकिर्दीत पुण्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रांत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण कामगिरीचा ठसा उमटवणारे, सर्वपक्षीय कार्यकर्त्यापासून ते सर्वसामान्य नागरिकांशी जिव्हाळ्याचा संबंध असलेले गिरीश बापट यांचं आज पुण्यात निधन झालं.  तळागाळापासून सुरुवात करून ते खासदारकीपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे.

जनसंघापासून कार्यरत असलेल्या पुण्यातील मोजक्या नेत्यांमध्ये भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे विद्यमान खासदार गिरीश बापट यांचा
समावेश होतो. युवा कार्यकर्त्यापासून पक्षकार्याला वाहून घेतलेल्या बापट यांनी या वर्षी सलग 40 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून पूर्ण केली. पुण्याच्या सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक घडामोडींशी निकटचा संबंध असलेल्या बापट यांचा सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यकत्र्यांशी, नेत्यांशी मित्रत्वाचे, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. साधेपणा हे बापट यांचे गुणवैशिष्ट्य. पक्षाने सांगितलेल्या अवघड वॉर्डमधून लढताना
त्यांनी तत्कालीन मोठ्या स्थानिक नेत्यांचा पराभव केला. टेल्कोमध्ये नोकरी करीत असताना त्यांना आणीबाणीमध्ये तुरुंगवास भोगावा
लागला. महापालिकेत पोटनिवडणुकीच्या माध्यमातून ते 1982 मध्ये नगरसेवक झाले. पंधरा वर्षांच्या नगरसेवकपदाच्या कारकिर्दीत ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले. पक्षाचा अवघड काळ असताना त्यांनी वसंत थोरात यांच्याविरुद्ध 1992 मध्ये कसबा पेठ मतदारसंघातून पोटनिवडणूक लढविली, तसेच सुरेश कलमाडी यांच्याविरुद्ध 1996 मध्ये लोकसभा निवडणूक लढविली. त्यात ते अयशस्वी ठरले.

मात्र, बापट 1995 मध्ये कसबा पेठ मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा या मतदारसंघातून
निवडणूक जिंकत त्यांनी पुण्यातून सर्वाधिक वेळा आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम केला. त्यानंतर 2019 मध्ये ते पुण्याचे खासदार म्हणून निवडून आले. विरोधी पक्षाचे आमदार असताना लोकलेखा समितीचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. तर संसदेत महत्त्वाच्या अंदाज समितीचे ते अध्यक्षही होते . भाजप-शिवसेना युतीचे सरकार 1995 मध्ये आले, तेव्हा ते पहिल्यांदा आमदार झाले होते. कृष्णा खोरे
विकास महामंडळाचे संचालक, तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्षपद या काळात त्यांच्याकडे होते. दुसर्‍यांदा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले तेव्हा पाच वर्षे बापट यांच्याकडे मंत्रिपद, तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्रिपद आले. याच काळात पुणे महापालिकेत भाजपची सत्ता आली. सर्व जाती-धर्माच्या संस्थांशी संपर्क, पुण्यातील सर्व सार्वजनिक कट्टे, धार्मिक स्थळे येथे बापट यांचा संचार असायचा. कार्यकत्र्यांशी थेट व दांडगा संपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य. भाजपबरोबरच अन्य पक्षांतील कार्यकर्ते व स्थानिक नेते यांच्याशीही त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. यंत्रणेची संपूर्ण माहिती हेही त्यांचे वैशिष्ट्य होतं.

थोडा मिस्कील स्वभाव असल्याने विनोदाच्या माध्यमातून ते अनेकांना आपलेसे करत. ते जाहीर पद्धतीने वाढदिवस साजरा करण्याचे टाळत. गेली 45 वर्षे घरगुती पद्धतीने वाढदिवस घरीच साजरा करणं याकडे त्यांचा कल असे. वाढदिवशी अंध, अपंग, गरीब विद्यार्थी, गोशाळा यांना ते मदत करायचे. सर्वसामान्य लोकांची कामे करीत त्यांना मदत करणे, कार्यकर्त्यांना, संस्थांना वेळोवेळी साह्य करणे याद्वारे त्यांनी मोठा मित्र परिवार गोळा केला. अनेक वर्षे पदावर राहूनही सामान्य माणसांसारखे वागण्याचा व्यवहार या उक्तीप्रमाणे ते कार्यरत राहिले.

Back to top button