पुणे बाजार समिती निवडणूक : पहिल्याच दिवशी बारा अर्ज दाखल | पुढारी

पुणे बाजार समिती निवडणूक : पहिल्याच दिवशी बारा अर्ज दाखल

पुणे; पुढारी वृत्तसेवा : कृषी उत्पन्न बाजार समिती पुणेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी बारा उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केले. यामध्ये हमाल मापाडी मतदारसंघातून तीन, सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सात, व्यापारी अडते मतदारसंघातून दोन जणांनी अर्ज सादर केले आहेत. ग्रामपंचायत मतदारसंघातून एकही अर्ज प्राप्त झाला नसल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली.

व्यापारी-आडते मतदारसंघातून श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड अडते असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष अनिरुद्ध भोसले यांनी दोन नामनिर्देशनपत्र सादर केली आहेत. हमाल-मापाडी मतदारसंघातून कामगार युनियनचे विद्यमान अध्यक्ष संतोष नांगरे यांनी दोन, तसेच शशिकांत नांगरे यांनीही अर्ज निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे सादर केला. सेवा सहकारी संस्था मतदारसंघासाठी सर्वसाधारण गटातून नितीन दांगट, रोहिदास उंद्रे, संदीप गोते, म्हस्के शेखर, सुभाष कांचन यांनी, तर महिला राखीव गटातून मनीषा हरपळे, विमुक्त जाती भटक्या जमाती गटातूून प्रमोद बोधे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले. 3 एप्रिल रोजी दुपारी तीनपर्यंत इच्छुकांना अर्ज सादर करता येणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकार्‍यांनी सांगितले.

Back to top button