पुणे : सिव्हिल कोर्ट इंटरचेंज ते रुबी हॉलपर्यंत धावली मेट्रो | पुढारी

पुणे : सिव्हिल कोर्ट इंटरचेंज ते रुबी हॉलपर्यंत धावली मेट्रो

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानकापासून रुबी हॉल स्थानकापर्यंत सोमवारी दुपारी मेट्रोची चाचणी घेण्यात आली. ताशी दहा किलोमीटर वेगाने ही मेट्रो धावली असून, सर्वसामान्य प्रवाशांसाठी दुसर्‍या टप्प्यातील हा मार्ग एप्रिलअखेरपर्यंत खुला होण्याची शक्यता आहे. महामेट्रो प्रशासनाच्या वतीने न्यायालयापासून दुपारी 3 वाजून 50 मिनिटांनी निघालेली मेट्रो रुबी हॉल येथे 4 वाजून 7 मिनिटांनी पोहचली. 17 मिनिटांच्या या प्रवासात मेट्रोचा वेग ताशी 10 किलोमीटर होता.

न्यायालयापासून सुरू झालेली मेट्रो संगम पूल पार करून मंगळवार पेठ (आरटीओ), पुणे रेल्वे स्थानक पार करून रुबी हॉल मेट्रो स्थानकापर्यंत पोहचली. महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्थानक ते फुगेवाडी स्थानक आणि वनाझ स्थानक ते गरवारे कॉलेज स्थानक या 12 किलोमीटर मार्गावर गेल्या वर्षी मार्च 2022 मध्ये मेट्रो धावण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर आता दुसर्‍या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट इंटरचेंज स्थानक आणि गरवारे कॉलेजपासून रुबी हॉल स्थानकापर्यंतच्या या एकूण 12 किलोमीटरची मार्गिका लवकरच प्रवाशांसाठी सुरू करणार असल्याचे मेट्रो प्रशासनाने सांगितले.

अशा झाल्या दुसर्‍या टप्प्यातील चाचण्या
गरवारे कॉलेज ते सिव्हिल कोर्ट : 25 नोव्हेंबर 2022
फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट : 31 डिसेंबर 2022
सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल : 27 मार्च 2023
एकूण मेट्रो मार्ग : 33 किलोमीटर
पहिला टप्पा : 12 किलोमीटर : प्रवाशांसाठी खुला
दुसरा टप्पा : 12 किलोमीटर : एप्रिलअखेरपर्यंत खुला
तिसरा टप्पा : 9 किलोमीटर : जुलैअखेरपर्यंत सुरू

दुसर्‍या टप्प्यातील या 12 किलोमीटरच्या तिन्ही मार्गिकांवरील कामे जवळपास संपुष्टात आली आहेत. उर्वरित कामे येत्या आठ ते दहा दिवसांत पूर्ण झाल्यावर या मार्गिकांचे सीएमआरएस निरीक्षण करण्यासाठी रेल्वे सुरक्षा आयुक्त यांना बोलावण्यात येईल. त्यांची मान्यता प्राप्त झाल्यानंतर प्रवासी सेवा या मार्गावर एप्रिलअखेरपर्यंत सुरू करण्यात येईल.

                  – डॉ. ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो

Back to top button