देहूगाव : गतिरोधकअभावी अपघाताची भीती | पुढारी

देहूगाव : गतिरोधकअभावी अपघाताची भीती

देहूगाव : देहूनगर पंचायत हद्दीतील माळीनगरमधील रस्त्यावर गतिरोधक नसल्याने वाहने वेगात येत आहेत. त्यामुळे या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात झाले असल्यामुळे नागरिकांनी गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे. श्रीकृष्ण मंगल कार्यालय, श्री सावता माळी मंदिर आणि महात्मा फुले चौक या ठिकाणी नियमानुसार गतिरोधक तयार करून त्यावर पांढरे पट्टे मारावेत आणि सूचना फलक बसवावेत, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वाहतूककोंडीत भर
परंडवाल चौक ते देहुरोड या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीपासून माळीनगरमधील अनगढशहा बाबा दर्ग्यापर्यंत उतार आहे. त्यामुळे देहूकडे जाणारी वाहने अतिशय वेगात असतात. त्यातच रस्त्याच्या एका बाजूला शाळा, महात्मा फुले चौकातून माळीनगर आणि पुढे बोडकेवाडीला जाणारा रस्ता आहे.

चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी कंपन्यांमध्ये काम करणार्‍या कामगारांची तसेच माल व प्रवासी वाहतूक करणारी वाहने देहुरोडकडे मोठ्या प्रमाणात ये-जा करत असतात. सकाळी 7 ते 11 आणि सायंकाळी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने वाहतूककोंडी होऊन दोन ते तीन किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसत असतात.

जीव मुठीत धरून ओलांडावा लागतो रस्ता
रस्त्याच्या एका बाजूला मराठी शाळा असल्याने पालकांना आपल्या पाल्यांना शाळेत सोडविताना धोका पत्करून रस्ता ओलांडावा लागतो. तर, महात्मा फुले चौकातून बोडकेवाडीकडे जाताना उतारावरून अतिशय वेगात येणार्‍या वाहनांचा धोका कायमचाच झाला आहे. आतापर्यंत या रस्त्यावर लहान-मोठे अपघात झाले आहेत. तर, काहींचा मृत्यूदेखील झाला आहे. त्यामुळे माळीनगर नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाने वर्दळीच्या रस्त्यावर गतिरोधक तयार करावेत, त्यावर रात्री दिसतील असे पांढरे पट्टे मारावेत आणि सूचना फलक बसवावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Back to top button