पुणे : बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड निलंबित | पुढारी

पुणे : बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड निलंबित

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदाचा अतिरिक्त पदभार पुणे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, बाजार समितीचे सचिव मधुकांत गरड यांना निलंबित करण्यात आले असून, त्यांचा पदभार पुणे शहर क्रमांक चारचे सहकार उपनिबंधक डी. एस. हौसारे यांच्याकडे देण्याचे आदेश शासनाने शनिवारी (दि.25) काढले आहेत.

पुणे बाजारसमिती मधील विविध कामांबाबत असलेल्या तक्रारी आणि बहुचर्चित कोट्यवधी रुपयांच्या भूखंडावर ठराविक आडत्यांना डाळिंबासाठी गाळे देण्याच्या प्रकरणात पणन संचालकांनी चौकशीचे आदेश दिले होते. त्या चौकशी अहवालानंतर गरड यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या सचिवपदाचा पदभार प्रशासक असलेले डी. एस. हौसारे यांच्याकडे देण्यात आला आहे. तर, यापूर्वी हौसारे यांच्याकडे असलेला अतिरिक्त प्रशासक पदाचा पदभार आता भोसले यांच्याकडे देण्यात येत असल्याचे सहकारचे कक्ष अधिकारी अनिल चौधरी यांनी शनिवारी काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

Back to top button