पुणे :  ’उत्पादन शुल्क‘ला आता खबर्‍यांचे जाळे ; दारूचे अवैध अड्डे शोधणार | पुढारी

पुणे :  ’उत्पादन शुल्क‘ला आता खबर्‍यांचे जाळे ; दारूचे अवैध अड्डे शोधणार

शिवाजी शिंदे :

पुणे :  राज्यातील विविध भागांत सुरू असलेले दारूचे अवैध अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग खबर्‍यांचे जाळे उभारणार आहे. त्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने तयारी सुरू केली आहे. एखाद्या गुन्ह्याच्या तपास करण्यासाठी अनेकवेळा पोलिस विभाग खब-यांचे सहकार्य घेते. त्यानंतरच बर्‍याचवेळा गुंतागुंतीच्या गुन्ह्याचा तपास लागला जातो. अगदी त्याचप्रमाणे राज्यातील विविध विभागांत बेकायदेशीरपणे गावठी दारू अड्डे चालविले जातात. यासह रसायनमिश्रित ताडी तसेच वेगवेगळ्या धाब्यांवर मिळणारी डुप्लिकेट विदेशी मद्य याचे धागेदोरे खूप लांबपर्यंत असतात.

विशेषत: गावठी दारूचे अड्डे असणार्‍या त्या परिसरातील संबंधितांची परिसरात मोठी दहशत असते. परिणामी, कोणीही त्याची माहिती देण्यासाठी पुढे येत नाही. मात्र, या सगळ्यावर मात करून उत्पादन शुल्क विभागास सहकार्य करण्यासाठी ‘खबर्‍यां’चे जाळे उभारणार आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून, हे खबरे उत्पादन शुल्कच्या तपासणी पथकाला मदत करणार आहेत. अनेकदा तपासणी पथकाने कारवाई केली तरी संबंधित ठिकाणी कोणतीही मालमत्ता सापडत नाही. त्यासाठी खबर्‍यांचे जाळे महत्त्वाचे ठरणार आहे.

Back to top button