पुणे : मनोज वाजपेयी यांच्या चित्रपटातील संवादाने जिंकली विद्यार्थ्यांची मने | पुढारी

पुणे : मनोज वाजपेयी यांच्या चित्रपटातील संवादाने जिंकली विद्यार्थ्यांची मने

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ या चित्रपटातील गाजलेला ‘हजरात हजरात हजरात…’ हा संवाद प्रसिद्ध अभिनेते मनोज बाजपेयी यांनी सादर करताच विद्यार्थ्यांनी शिट्या अन् टाळ्यांचा कडकडाट केला. आमची काम करण्याची पद्धत वेगळी असते. पात्र जसे असेल तसेच ते आम्ही निभावण्याचा प्रयत्न करतो, असे सांगत खास बिहारी स्टाईलमध्ये संवाद सादर करीत बाजपेयी यांनी सर्वांचीच मने जिंकली अन् आपल्याला हवे ते करीत राहा, असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

निमित्त होते सामाजिक-आर्थिक विकास संस्था, स्वप्नभूमी कृत आणि एचसीएल फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित फिरोदिया करंडक स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे. मनोज बाजपेयी यांच्या हस्ते प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या बीएमसीसी महाविद्यालयाला फिरोदिया करंडक देण्यात आला. सर परशुरामभाऊ महाविद्यालयाला दुसर्‍या क्रमांकाचे, तर आकुर्डीतील डॉ. डी. वाय पाटील आर्किटेक्टर महाविद्यालयाला तिसर्‍या क्रमाकांचे पारितोषिक देण्यात आले. ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया, विजय अय्यर, सूर्यकांत कुलकर्णी आदी उपस्थित होते.

सावनी रवींद्र, निपुण धर्माधिकारी आणि आशिष कुलकर्णी यांनाही सन्मानित केले. बाजपेयी म्हणाले की, वयाच्या 18 वर्षांपर्यंत मला फिरोदियासारखे व्यासपीठ मिळाले नाही. नाटकाची सुविधा नव्हती. मला जे करायचे नव्हते ते मी करीत होतो. पण, आज तुम्हाला हवे ते मिळाले आहे. तुम्हाला जे मांडायचे आहे ते तुम्ही मांडू शकता. त्यामुळे ‘मुझे आपसे जलन है’… अशी भावना बाजपेयी यांनी व्यक्त केली. केंद्र आणि राज्य सरकारने शाळांमध्ये किमान एक कला अनिवार्य केली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

Back to top button