पुणे : सायबर गुन्हेगारी रोखणार ‘हनीपॉट’ ; ‘सी-डॅक’चे तंत्रज्ञान | पुढारी

पुणे : सायबर गुन्हेगारी रोखणार ‘हनीपॉट’ ; ‘सी-डॅक’चे तंत्रज्ञान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सरकारी यंत्रणेचा वापर करून सायबर गुन्हेगारांकडून होत असलेल्या फसवेगिरीला लगाम लावण्याचे काम सी-डॅक (प्रगत संगणक विकास केंद्र) ने विकसित केलेल्या ‘हनीपॉट फ्रेमवर्क’द्वारे केले जाणार आहे. याशिवाय उपग्रहाकडून मिळालेली माहिती व वनअधिकार्‍यांच्या माहिती आधारे जंगलातील वणवा पसरण्याचे क्षेत्र दर्शविणारे ‘फायर स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम’ विकसित करण्यात यश मिळविले आहे. ‘सीडॅक’चे महासंचालक ई. मंगेश यांनी मंगळवारी (दि. 21) पाषाण येथील सी-डॅक कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी कार्यकारी संचालक कर्नल (नि.) ए. के. नाथ उपस्थित होते. सी-डॅकचा 36 वा वर्धापन दिन बुधवारी (22 मार्च) होत असून, हा सोहळा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या उपस्थितीत होणार आहे.

‘फायर स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम’
वणव्यांमुळे वनसंपदेचे होणारे नुकसान टाळण्यासाठी ‘फायर स्प्रेड सिम्युलेशन सिस्टिम’ ही प्रणाली तयार करण्यात आली आहे. उपग्रह आणि वनअधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वणवा किती भागात पसरू शकतो, याचा अंदाज वर्तवला जातो. या प्रणालीची सिक्किममध्ये चाचणी घेण्यात आली. ही प्रणाली सिक्किमच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, आयआयटी खरगपूर यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आली आहे. लवकरच वनविभागांना ही प्रणाली उपलब्ध होईल.

दोन हजार ठिकाणी कार्यान्वित
सी-डॅकद्वारे सायबर धोक्यांचे निरीक्षण, विश्लेषण व ते रोखण्यास सक्षम करणारे ‘हनीपॉट फ—ेमवर्क’ विकसित करण्यात आले आहे. हल्लेखोरांचे वर्तन समजून घेत त्याचा अभ्यास करण्यास मदत होऊ शकते. या प्रणालीची प्रायोगिक स्तरावर दोन वर्षे चाचणी घेण्यात आली. त्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्जवर आधारित ही प्रगत स्वरूपातील प्रणाली देशभरातील दोन हजार ठिकाणी कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘एनसीव्हीईटी’ची संलग्नता
‘सी-डॅक’कडून सुरू केलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम आतापर्यंत नॅशनल स्कील करिक्युलम फ—ेमवर्कवर (एनएसक्युएफ) आधारित होते. आता हा अभ्यासक्रम नॅशनल क्रेडिट फ—ेमवर्कनुसार करण्यात आले आहेत. तसेच, अभ्यासक्रमांना नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंगची (एनसीव्हीईटी) संलग्नता प्राप्त करण्यात आली असल्याची माहितीही कर्नल (नि.) ए. के. नाथ यांनी दिली.

Back to top button