कर्मचारी वेळ पाळेनात! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील स्थिती | पुढारी

कर्मचारी वेळ पाळेनात! खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील स्थिती

खडकी; पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यालयातील कर्मचारी उशिरा येतात. बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनेक वेळा कार्यालयीन कामासाठी बाहेर असल्याने कर्मचार्‍यांचे चांगलेच फावले आहे. उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकाकडून होत आहे. बोर्डाचे कर्मचारी अनेक वेळा कार्यालयात उशिरा येतात, तर काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर नसतात.

मुख्य कार्यकारी अधिकारी अनेक वेळा प्रशासनाशी संबंधित बैठकांना बाहेर जातात. यामुळे उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांचा कोणावरही अंकुश राहिला नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत खासगी कामासाठी तासंतास कार्यालयाबाहेर जात असल्याचे नागरिकांनी सांगितले.

काही महिला कर्मचारी दुपारच्या सुट्टीमध्ये जेवणासाठी घरी जातात. त्या चक्क साडेतीन ते चारच्या सुमारास पुन्हा कार्यालयात येतात. तर काही महिला कर्मचारी जेवणाची सुटी संपल्यानंतरदेखील कार्यालयाच्या परिसरात शतपावली करताना दिसतात. तसेच काही कर्मचारी कार्यालयीन वेळेच्या आधीच घरी निघून जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. अधीक्षक सुजा जेम्स यांचा कर्मचार्‍यांवर अंकुश राहिला नसल्याचे नागरिकांची म्हणणे आहे.

नागरिकांची गैरसोय…

कार्यालयात कर्मचारी वेळेत हजर राहणे अपेक्षित असून, त्यासाठी बसविलेली बायोमॅट्रिक्स यंत्रणा बंद आहे. यामुळे कर्मचारी कार्यालयीन वेळा पाळत नाहीत, यामुळे कार्यालयात विविध कामांसाठी येणार्‍या नागरिकांची गैरसोय होत आहे. बोर्ड प्रशासनाने उशिरा येणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

काही कर्मचारी कामानिमित्त साइटवर जात असल्याने त्यांना वेळेचे बंधन घालता येत नाही. कार्यालयातील कर्मचारी वेळेवर उपस्थित राहतात. बायोमेट्रिक्स मशिनमध्ये बिघाड झाल्याने कर्मचार्‍यांची हजेरी मस्टरवर घेण्यात येत आहे.

                                                       – सुजा जेम्स,
                                कार्यालयीन अधीक्षक, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड

Back to top button