पुण्याला मिळणार 80 नव्या लालपरी, 75 ई-शिवाई | पुढारी

पुण्याला मिळणार 80 नव्या लालपरी, 75 ई-शिवाई

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाकडून पुणे विभागाला 150 इलेक्ट्रिक शिवाई बस देण्यात येणार आहेत. त्यापैकी 75 ई-बस मार्चअखेरपर्यंत पुण्याला मिळणार आहेत. यासोबतच पुणे विभागाला 80 नव्या लालपरी आणि 100 इलेक्ट्रिक शिवनेरी बससुद्धा मिळणार आहेत. एसटी महामंडळाच्या वतीने दापोडी येथे आयोजित पत्रकार भेटीदरम्यान महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्याशी संवाद साधण्यात आला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. महामंडळाचे व्यवस्थापक नंदकुमार कोल्कर, दापोडी कार्यशाळेचे व्यवस्थापक डी.जी.चिकोर्डे, महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले व अन्य उपस्थित होते.

…तर पीएमपीप्रमणे एसटीलाही धोका
एसटी महामंडळ पीएमपीएमएल प्रमाणेच भाडेतत्त्वावर बस खरेदी करण्यावर भर देत असल्याचे दिसत आहे. मात्र, ताफ्यातील बहुतांश बस जर भाडेतत्त्वावरील झाल्या, तर एसटीचीदेखील पीएमपीप्रमाणेच अवस्था होण्याचा धोका आहे. कारण, मागील आठवड्यात पीएमपीच्या ठेकेदारांनी बिले थकल्यामुळे अचानक संप पुकारला. त्यामुळे पुणेकर प्रवाशांचे मोठे हाल झाले. एसटीच्या ठेकेदारांनी आगामी काळात असे केले तर पुण्याच्याच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे.3

101 डेपोंमध्ये 172 ई-चार्जिंग स्टेशन उभारणार
एसटी महामंडळाच्या ताफ्यात नव्याने 5 हजार 150 ई-बस लवकरच दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळ या गाड्यांकरिता राज्यातील 101 डेपोंमध्ये 172 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे, असे एसटीचे उपाध्यक्ष चन्ने यांनी सांगितले.

राज्यासाठी 5 हजार ई बस; तर 2 हजार साध्या बस
एसटी महामंडळ राज्यभरातील प्रवाशांकरिता 5 हजार 150 इलेक्ट्रिक शिवाई बस भाडेतत्त्वावर घेणार आहे. तर 2 हजार स्व:मालकीच्या बस खरेदी करणार आहे. त्यातील साध्या बसची बांधणी दापोडीतील एसटीच्या कार्यशाळेत होणार असून, यामुळे राज्यातील प्रवाशांना पूरक गाड्या उपलब्ध होणार आहेत.

100 ई-शिवनेरी या मार्गांवर धावणार…
एसटी महामंडळ ई-शिवाई, नव्या लालपरीसोबतच इलेक्ट्रिकवर धावणार्‍या 100 इलेक्ट्रिक बस खरेदी करणार आहे. त्या सर्व बस पुणे विभागाला मिळणार असून, या बस पुणे -मुंबई, पुणे-ठाणे, पुणे-बोरिवली या मार्गांवर धावणार आहेत.

 

Back to top button