पुणे : आरटीईसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक अर्ज ; अर्ज नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस | पुढारी

पुणे : आरटीईसाठी यंदा रेकॉर्ड ब्रेक अर्ज ; अर्ज नोंदणीसाठी आज शेवटचा दिवस

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) आर्थिक दुर्बल आणि वंचित घटकांमधील मुलांच्या पहिली आणि नर्सरीच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेला पालकांनी उदंड प्रतिसाद दिला. यंदा प्रवेशासाठी तब्बल 3 लाख 2 हजार 475 अर्ज आले आहेत. अर्ज नोंदणीसाठी आज (दि.17) शेवटचा दिवस असणार आहे. अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ मिळणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे.

शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) स्वयंअर्थसाहाय्यित, खासगी विनाअनुदानित, खासगी कायम विनाअनुदानित शाळांमध्ये मोफत प्रवेश व शिक्षण देण्यात येत असते. संबंधित शाळांमध्ये राखीव असणार्‍या 25 टक्के जागांवर प्रवेशासाठी राबविण्यात येणार्‍या आरटीई प्रवेश प्रक्रियेला (दि.1) मार्चपासून सुरुवात झाली. तर पालकांना आपल्या मुलांच्या प्रवेशासाठी 17 मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे. यंदाच्या आरटीई प्रवेश प्रक्रियेत 8 हजार 828 शाळा असून, त्यामध्ये 1 लाख 1 हजार 969 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत.
पुणे जिल्ह्यात 936 शाळांनी 15 हजार 655 प्रवेशाच्या जागा उपलब्ध झालेल्या आहेत.

यासाठी तब्बल 66 हजार 76 बालकांचे अर्ज नोंदविण्यात आलेले आहेत. नागपूरमध्ये 32226, ठाण्यात 26793, नाशिकमध्ये 18095, छत्रपती संभाजीनगरात 16719, रायगडमध्ये 9098, मुंबईमध्ये 15200, अहमदनगरमध्ये 7882 जळगावमध्ये 9252 नांदेडमध्ये 8876 अशा प्रकारे काही जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक नोंदणी झाल्याचे दिसून येत आहे.

आरटीई प्रवेशाच्या नोंदणीला यंदा पालकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे तब्बल सव्वातीन लाख अर्ज आल्याची प्राथमिक माहिती आहे, तरीदेखील पालकांची अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आहे. यासंदर्भात आज दि.17 बैठक घेऊन मुदतवाढ देण्याचे निश्चित करण्यात येईल. अर्ज करण्यास चार ते सहा दिवसांची मुदतवाढ देता येणार आहे. त्यासंदर्भात निर्णय जाहीर करण्यात येईल.
                                – शरद गोसावी, संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय

Back to top button