पुणे : वाल्हेतील पाणीपुरवठ्याच्या टाकीचा प्रश्न मिटला | पुढारी

पुणे : वाल्हेतील पाणीपुरवठ्याच्या टाकीचा प्रश्न मिटला

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  आळंदी-पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गाच्या कामामुळे वाल्हे (ता. पुरंदर) गावाला पाणीपुरवठा करणारी पाण्याची टाकी जमीनदोस्त होणार आहे. नवीन टाकीला जागा मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीने गेल्या तीन वर्षांपासून गावानजीक भवानीमाता डोंगरावरील वन विभागाच्या 14 गुंठे जागेचा पाठपुरावा केला. अखेर या प्रयत्नांना नुकतेच यश आले असून, वन विभागाने पाण्याच्या टाकीच्या जागेसाठीच्या प्रस्तावास मंजुरी दिल्याची माहिती सरपंच अमोल खवले यांनी दिली. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गाचे काम मागील काही दिवसांपासून जोमात सुरू आहे.

महामार्गाच्या रुंदीकरणामध्ये वाल्हे गावाला पाणीपुरवठा करणारी पिण्याच्या पाण्याची टाकी जाणार आहे. त्यामुळे वाल्हे गावाला दुसरी टाकी कोठे बांधायची, यासाठी ग्रामपंचायतीकडून मागील 3 वर्षांपासून प्रयत्न केले जात होते. गावच्या पूर्वेला असलेल्या भवानीमाता डोंगरावरील वन विभागाच्या 14 गुंठे जागेची मागणी ग्रामपंचायतीने केली होती. त्यानुसार विरोधी पक्षनेते अजित
पवार, खासदार सुप्रिया सुळे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या माध्यमातून पाठपुरावा देखील सुरू होता.
याची दखल घेऊन वन विभागाच्या वतीने तत्कालीन भोर उपविभागीय वन अधिकारी आशा भोंग, वनपरिक्षेत्र अधिकारी सासवड जयश्री जाधव यांनी नियोजित पाण्याच्या टाकीच्या जागेची पाहणी मागील वर्षी केली. तसेच, लवकरच जागेची मंजुरी मिळवून देण्यासाठी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले होते. दरम्यान वन विभागाने पाण्याच्या टाकीच्या जागेसाठीच्या प्रस्तावास मंजुरी दिली.

 

Back to top button