पुणे : पथारीविक्रेते, हातगाडीचालकांनी व्यापले रस्ते | पुढारी

पुणे : पथारीविक्रेते, हातगाडीचालकांनी व्यापले रस्ते

समीर सय्यद : 

पुणे : वाढते अतिक्रमण आणि वाढीव ‘एफएसआय’चे आश्वासन पूर्ण करण्यात कॅन्टोन्मेंट बोर्ड अपयशी ठरले आहे. त्यामुळे महात्मा गांधी रस्ता-ताबूत स्ट्रीट (वॉर्ड नंबर आठ) मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. पथारी विक्रेते आणि हातगाडी विक्रेत्यांनी पदपथ आणि रस्ते गिळंकृत केले आहेत. महात्मा गांधी रस्ता, भीमपुरा लेन क्रमांक 22 ते 29, ताबूत इस्टेट, सैफी लाइन, जुने मटण मार्केट, ईस्ट स्ट्रीट, शिंपी आळी आदी परिसर या वॉर्डात येतो. ‘एफएसआय’अभावी ब्रिटिशकालीन जुन्या घरांच्या पुनर्विकासातील अडचणी, पार्किंगचा प्रश्न, भरमसाठ मिळकत कराचा बोजा, पावसाळ्यात बैठी घरे व दुकानांत शिरणारे पाणी, डासांचा वाढता प्रादुर्भाव आदी नागरी समस्या पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक आठ महात्मा गांधी रस्ता-ताबूत स्ट्रीटमध्ये भेडसावत आहेत.

रस्ते आणि पदपथांवरील अतिक्रमणे हा वॉर्डातला कळीचा प्रश्न आहे. तीन दशकांपूर्वी महात्मा गांधी रस्त्यावरील पथारी विक्रेत्यांना फॅशन स्ट्रीट मार्केट बांधून तिथे स्थलांतरित करण्यात आले. कॅम्प परिसरातला हा प्रमुख रस्ता मोकळा व्हावा, रस्त्याची वहनक्षमता वाढावी, हा त्यामागचा उद्देश होता. मात्र, गेल्या काही वर्षांत महात्मा गांधी रस्ता आणि लगतच्या पदपथांवर मोठ्या प्रमाणात पथारी विक्रेते, हातगाडीधारकांचे पुन्हा अतिक्रमण झाले आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारीनंतर अतिक्रमणांवर कारवाई होत नाही. कॅन्टोन्मेंटच्या किचकट नियमावलीमुळे वडिलोपार्जित मालमत्ता हस्तांतरित करण्यात अडचणी येतात. दुसरीकडे नळाला मात्र कमी दाबाने पाणी येते, बोर्डाने या तक्रारींची दखल घ्यावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

 

वार्डात इतर भागांच्या तुलनेत कमी दाबाने पाणीपुरवठा होत असून, मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत आहे. ती थांबविण्यासाठी जलवाहिनी बदलण्याची आवश्यकता आहे. महात्मा गांधी रस्त्याची ओळख देशभर आहे. मात्र, त्या रस्त्यापलीकडे असणार्‍या गल्लीमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
                                                 – अतुल गोंदकर, सामाजिक कार्यकर्ते.

वार्डात रस्त्यावर दोन्ही बाजूंना पार्किंग आणि मध्येच हातगाडीधारकांच्या अतिक्रमणामुळे स्थानिक नागरिकांची प्रचंड गैरसोय होते. ताबूत स्ट्रीटवरही अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे स्थानिक नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याकडे बोर्ड प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
                            – मंजूर शेख, माजी उपाध्यक्ष, कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे.

Back to top button